…तर आम्हांला आनंदच होईल, पण राज-उद्धव एकत्र येणार? काय म्हणाले सर्वपक्षीय नेते?

राज-उद्धव हे दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हांला आनंदच आहे. यावर मी कालच प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय भाष्य योग्यवेळी करु... पण अट आणि कट त्यांनी टाकलेला मुद्दा आहे. आमचा मुद्दाच नाही.

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात पु्न्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का? यावर शनिवारपासून राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. वेगवेगळी मतं आणि तर्कवितर्क लावले जात आहेत. “माझ्यासाठी महाराष्ट्र खूप मोठा आहे, वाद, भांडणं ही खूप लहान गोष्ट आहे”, असं राज ठाकरेंनी एका यूटूब मुलाखतीत म्हटलेय. यानंतर उद्धव ठाकरेंकडूनही याला सकारात्मक प्रतिसाद आला आहे. “आमच्यात वाद, भांडणं कधी नव्हतीच…, चला मिटवली”, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेय. यानंतर राज-उद्धव हे दोन ठाकरे बंधू पुन्हा एकदा येणार का? यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, राज-उद्धव यांच्या एकत्र येण्यावरुन राजकीय पक्षातील नेत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आम्ही विचलित नाही तर आम्ही स्वयंचलित – शेलार

दरम्यान, राज-उद्धव हे दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हांला आनंदच आहे. यावर मी कालच प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय भाष्य योग्यवेळी करु… पण अट आणि कट त्यांनी टाकलेला मुद्दा आहे. आमचा मुद्दाच नाही. त्यामुळं कुठूनही विचलित नाही तर आम्ही स्वयंचलित आहोत. अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार तथा मंत्री आशिष शेलार यांनी राज-उद्धव यांच्या एकत्र येण्यावरुन दिली आहे.

स्वार्थ साधण्याचा उबाठा-मनसेचा प्रयत्न – निरुपम

महाराष्ट्र हिताच्या नावाने राजकारण करणाऱ्या उबाठा आणि मनसे या दोन्ही पक्षांना महाराष्ट्रातील जनतेने नाकारले आहे. दोन्ही पक्ष राजकीयदृष्ट्या संपलेलेल असून, स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी दोन्ही नेत्यांचा प्रयत्न आहे. उबाठाने बाळासाहेबांच्या विचारांचा त्याग केला आणि सत्तेसाठी, स्वत:च्या कुटुंबासाठी उबाठाने हिंदुत्वाशी गद्दारी करुन काँग्रेससोबत गेले. अशी जोरदार टीका शिंदे गटाचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली आहे. तर मनसेला विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. दोन शून्य एकत्र केले तरी बेरीज शून्यच होते. तोट्यातील दोन कंपन्या एकत्र आल्या तरी एक नफ्यातील कंपनी बनत नाही, असा टोला निरुपम यांनी लगावला आहे.

ते कसे सर्टिफेकिट वाटू शकतात – देशपांडे

महाराष्ट्रप्रेमी कोण आणि कोण नाही. हे शिवसेना ठाकरे गट कसे काय ठरवू शकतो. आणि महाराष्ट्रप्रेमीचे सर्टिफेकिट ते कसे काय वाटू शकतात. असा सवाल मनसे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना १७ हजार मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले होते. ते कृत्य त्यांचे चुकीचे होते, म्हणून याबाबत ते माफी मागणार आहेत का? असा प्रश्न संदीप देशपांडेंनी ठाकरे गटाला विचारला आहे.

ही चांडाळ चौकडी त्यांना एकत्र येऊ देणार नाही – शिरसाठ

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले तर आम्हांला आनंदच आहे. पण ते एकत्र येणार नाहीत. कारण त्यांच्या आजूबाजूला बसलेली चांडाळ चौकडी त्यांना एकत्र येऊ देणार नाही. ते एकत्र आले तर यांची दुकानं बंद होतील. यांची दुकानं चालणार नाहीत. त्यामुळं चांडाळ चौकडी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार तथा मंत्री संजय शिरसाठ यांनी दिली आहे.

मला सर्वांधिक आनंद होईल – भुजबळ

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले सर्वांधिक आनंद मला होईल, आणि शिवसेनेची ताकद वाढेल. तसेच हे दोघे एकत्र आल्यास माझ्याएवढा आनंद कुणालाच होणार नाही. मी जरी शिवसेनेतून बाहेर पडलो असलो तरी माझे शिवसेनेवर अजूनही प्रेम आहे. मी यापूर्वीही त्यांना फोन करुन सांगितले होते की, तुम्ही वेगळे होऊ नका, पण जर दोन भाऊ एकत्र आले तर मला आनंदच होईल आहे, अशी प्रतिक्रिया आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच ठाकरे कुटुंबच कशाला राज्यातील सर्व कुटुंबानी एकत्र आलं पाहिजे, त्यामुळं कौटुंबिक स्वास्थ चांगले राहिले, असंही भुजबळ यांनी म्हटले आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News