पुण्यातील वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडल्याचे चित्र आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. वाढते लोकसंख्या प्रमाण, रस्त्यांवरील वाहनांची संख्या आणि अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे यामागचे प्रमुख कारण आहे. शाळा-कॉलेज, ऑफिसच्या वेळेत रस्त्यांवर प्रचंड गर्दी होते. त्यामुळे वेळेचा अपव्यय, इंधनाचा जास्त वापर तसेच प्रदूषणाची समस्या वाढते. पार्किंगची सोय अपुरी असल्याने रस्त्यांवर बेकायदेशीर पार्किंग होते आणि त्यामुळे कोंडी अजूनच वाढते. वाहतुकीतील शिस्तभंग, नियमांचे पालन न करणे हे देखील मोठे कारण आहे. या समस्येवर उपाय म्हणून सार्वजनिक वाहतूक सुधारावी, मेट्रो व बससेवा वाढवावी आणि नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत या चौका-चोकातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी आता मेगाप्लॅन तयार करण्यात येत आहे.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेगा-प्लॅन
ना पुणे-मुंबई महामार्ग आणि मुंबई-बंगळूरू महामार्गावरील काही महत्त्वाच्या चौकांमधील वाहतूक कोंडी लवकरच संपुष्टात येणार आहे. देहूरोड येथील सेंट्रल चौक, किवळे मुकाई चौक, तसेच पुनावळे, ताथवडे आणि वाकड येथील भूमकर व भुजबळ चौकांमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी एक ‘मेगा प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांचे प्रत्येकी 12 मीटरपर्यंत रुंदीकरण केले जाणार आहे. याशिवाय, किवळे ते बालेवाडी स्टेडियमपर्यंत सुमारे 8.6 किलोमीटर लांबीचा ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ तयार केला जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा ‘डीपीआर’ तयार असून आवश्यक जागेचे भूसंपादन पिंपरी चिंचवड महापालिकेने सुरू केले आहे.
उपाययोजन राबविण्यास सुरूवात, प्रश्न सुटणार?
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने सादर केलेल्या या योजनेवर लवकरच काम सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 85 टक्के शेतकऱ्यांनी आपल्या जमिनींचा ताबा प्राधिकरणाला दिला आहे. सध्या अतिक्रमणे हटवण्यासाठी मार्किंगचे काम सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांना अजून मोबदला मिळालेला नाही, त्यांनी नगररचना विभागात प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही ठिकाणी शिबिरे लावून मोबदल्याचे वितरण केले जाणार आहे.
किवळे चौक, समीर लॉन, पुनावळे, ताथवडे आणि भूमकर चौक येथे भुयारी मार्ग तयार केले जातील. यामुळे वाहतूक अधिक सुरळीत होईल, या ठिकाणी भुयारी मार्गांचे नियोजन आहे. एलिव्हेटेड मार्गात चार मार्गिका (लेन्स) असतील. तसेच रस्त्यावरही चार मार्गिका असतील. भूमकर चौकात दुमजली उड्डाणपूल बांधला जाईल, यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. दोन्ही नद्यांवरील सध्याच्या पुलांवर प्रत्येकी तीन मार्गिका वाढवल्या जाणार आहेत. त्यामुळे हा प्रश्न सुटतो का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





