MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

मुख्यमंत्री असताना ‘कॉमन मॅन’ म्हणून काम केलं, आता डीसीएम ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ म्हणून काम करतोय – एकनाथ शिंदे

Written by:Astha Sutar
नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका देशभर नेली आणि तिथं रुजवली वाढवली. राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक, आध्यात्मिक अधिष्ठान नेहमीच वरचढ राहिले आहे. वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, साधुसंतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्री असताना ‘कॉमन मॅन’ म्हणून काम केलं, आता डीसीएम ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ म्हणून काम करतोय – एकनाथ शिंदे

Eknath Shinde – संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत नामदेव महाराज यांच्या रचना या मराठी भाषेतच आहेत. त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आपल्या कारकिर्दीत मिळाला याचे समाधान आहे, आता हे संत साहित्य भारतातील १४ भाषांमध्ये पोहोचण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करु, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पंढरपूर येथील संत नामदेव महाराज जन्मस्थान वाडामधील श्री. केशवराज मंदिरात एकनाथ शिंदेंचा आज संतशिरोमणी श्री. संत नामदेव महाराज पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

अखिल विश्वाचे संत होते…

दरम्यान, नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका देशभर नेली आणि तिथं रुजवली वाढवली. वारकऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून देणारे नामदेव महाराज केवळ महाराष्ट्राचेच नाही तर अखिल विश्वाचे संत होते. संत नामदेव महाराजांनी मराठीला अडीच हजार अभंगांचे देणं दिले. अनेकवेळा मी पंढरपुरात येऊन गेलो, पण आजचे वातावरण बघून मन भरुन गेले. संत नामदेव महाराजांच्या जन्मस्थानी हा सोहळा होतोय, या वाड्यात अनेक संतांचे वास्तव्य होते. प्रत्यक्ष पांडुरंगाने इथं सेवा केली. त्यामुळे इथं पुरस्कार मिळणं हे मोठं भाग्य समजतो. असं शिंदे म्हणाले.

नतमस्तक होण्याचा आजचा क्षण…

हा पुरस्कार माझ्या सर्व सहकाऱ्यांचा, माझ्यावर प्रेम करणाऱ्या लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा, लाडक्या शेतकऱ्यांचा पुरस्कार असल्याची भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. नामदेव महाराजांच्या नावे हा पुरस्कार म्हणजे कृतार्थ होण्याचा आणि नतमस्तक होण्याचा आजचा क्षण आहे, असे ते म्हणाले. मला काय मिळालं यापेक्षा समाजाला काय देणं लागतो ही भावना ठेवून आजवर काम केले. हा पुरस्कार कोणत्याही पदापेक्षा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. संत सजन्नांनी आणि लाखो वारकऱ्यांनी दिलेला हा पुरस्कार रुपी आशिर्वाद आहे.

रक्ताचा थेंब असेपर्यंत जनतेची सेवा करणार…

या राज्यात कोणी उपाशी राहू नये, औषध उपचारांविना रुग्णांचे हाल होता कामा नये, शिक्षणापासून कोणी वंचित राहता कामा नये, शेतकऱ्यांनी आत्महत्या करता कामा नये, अशीच सरकारची भावना आहे. हा एकनाथ शरिरात रक्ताचा थेंब असेपर्यंत जनता जर्नादनाची सेवा करत राहिल. मुख्यमंत्री असताना कॉमन मॅन म्हणून काम केलं, आता डीसीएम अर्थात डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून काम करतोय, बाळासाहेब, दिघे साहेब सांगायचे संत सेवा, जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि त्याच मार्गाने आपण पुढे जातोय, असे शिंदे म्हणाले.