इन्स्टाचे 8 लाख फॉलोअर्स मिळवण्यासाठी गळ्याला चॉपर; आयडी-पासवर्डची दोघांकडे मागणी, असा वाचला जीव

Smita Gangurde

नाशिक- इन्स्टाग्रामवरील लाखो फॉलोअर्स ही तशी खरं तर अभिमानाची बाब. मात्र या जास्त ऑफोअर्सची संख्या एखाद्याच्या जीवावर बेतली असेल तर? तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण नाशिकमध्ये इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्ससाठी आरोपींनी दोन मित्रांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय.

नाशिकच्या ट्रॅक्टर हाऊस परिसरात दोन मुलांच्या गळ्यावर चॉपर ठेवून तीन आरोपी त्यांच्याकडून इन्स्टाग्रामच्या आयडीची आणि पासवर्डची मागणी करत होते. नेमकं त्याचवेळी पोलीस त्या भागात गस्त घालत होते. त्यांना मुलांचा आरडाओरडा ऐकू आला. ते धावत त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी या मुलाचे प्राण वाचवले. धमकावणाऱ्या तिन्ही संशयितांना पोलिसांनी चॉपरसह ताब्यात घेतलंय.

नेमका का घडला हा प्रकार?

पीडित मुलांचं इन्स्टाग्रामवर अकाऊंट असून त्यांचे प्रत्येकी आठ लाख फॉलोअर्स आहेत. मुख्य आरोपी फरीद मन्सुरी याच्यासह अन्य दोघांनी पीडितांकडे त्यांच्या इन्स्टा आयडीची आणि पासवर्डची मागणी केली होती. पीडित मुलांनी नकार दिल्यानं त्याचा राग येऊन संशयितांनी त्यांना मारहाण केली. संशयित फरीद मन्सुरी यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चॉपर जप्त केला आहे. इतर अल्पवयीन संशयितांची निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून दोघा अल्पवयीन पीडित मुलांची सुटका करण्यात पोलिसांना यश आलंय.

डिजिटल चोरीकडे गुन्हेगारीचा कल

धमकावणारे आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं तपासात समोर आलंय. चोरीचे पैसे वाटप करणे, मोबाइल ओढून घेणे, दुचाकीची चोरी करणे, घरफोडी करणे असे विविध गुन्हे संशयितांकडून केले जात होते. ऑनलाइनच्या युगात आता असे गुन्हेगार डिजिटल चोरीकडे वळू लागले आहेत. इन्स्टाचे हे आयडी इतरांना विक्री करून त्यातून मोठी रक्कम कमावण्याचा या आरोपींचा प्रयत्न होता.

ताज्या बातम्या