दिल्लीत उच्च न्यायालयाने अभिनेता सलमान खान यांचे पर्सनॅलिटी राइट्स उल्लंघन प्रकरण गांभीर्याने घेत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि इंटरमीडियरी कंपन्यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. सलमान खान यांच्या नावाचा, फोटोचा किंवा त्यांच्या प्रतिमेला व्यापारी स्वरूपात वापरणाऱ्या कोणत्याही संस्थेवर कठोर कारवाई होऊ शकते, असा स्पष्ट संदेश न्यायालयाने दिला.अभिनेता सलमान खान यांनी अनेक कंपन्या आणि ऑनलाइन मार्केटप्लेसवर गंभीर आरोप करत कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानुसार त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे नाव, चेहरा किंवा ‘पर्सनॅलिटी अॅट्रिब्युट्स’ वापरून मर्चेंडाइज विकली जात असल्याचा दावा करण्यात आला होता.
3 दिवसांत कारवाईचे आदेश
जस्टिस मनमीत प्रीतम सिंह अरोरा यांनी सुनावणीदरम्यान काही प्रतिवादींना (डिफेंडंट 2, 4, 6) आयटी इंटरमीडियरी रूल्स अंतर्गत तीन दिवसांत कारवाई करण्यास सांगितले. तसेच ज्यांनी सलमान खान यांचे नाव किंवा फोटो वापरून कमर्शियल मर्चेंडाइजची विक्री केली आहे, त्यांच्यावर थेट ‘स्टे ऑर्डर’ दिला जाईल, असेही स्पष्ट केले. कोर्टाने विशेष निर्देश देताना सांगितले की, ट्रेडमार्कचा वापर करणाऱ्या प्रतिवादी क्रमांक 2 ने त्यांचा निर्णय घेण्यापूर्वी सलमान खान यांच्या आयपी (IP) राइट्सचा व्यवस्थित विचार करणे आवश्यक आहे.

सुनावणीदरम्यान एप्पल आणि AI चॅटबॉटचा उल्लेख
सलमान खान यांच्या वतीने वरिष्ठ वकील संदीप सेठी यांनी मांडणी करताना सांगितले की, एप्पल, AI चॅटबॉट्स, काही ई-मार्केटप्लेस तसेच रेडबबलसारख्या प्लॅटफॉर्मनीही सलमान खान यांच्या पर्सनॅलिटी राइट्सचे उल्लंघन करणारी सामग्री उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय त्यांनी काही फॅन अकाउंट्सवरही प्रश्न उपस्थित केला, कारण या अकाउंट्सद्वारे फोटोशॉप केलेले फोटो वापरले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यावर सेठी म्हणाले – “हे फोटो माझे असले तरी ते एडिट केलेले आहेत. शिवाय हे माझे (सलमान खानचे) रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहेत. त्यांचा वापर परवानगीशिवाय होत आहे. कोर्टाने प्रत्युत्तरात निरीक्षण नोंदवले की, फोटोशॉप केलेली चित्रे अश्लील किंवा आक्षेपार्ह पद्धतीने वापरली नसल्याचे दिसते. मात्र सेठींचा आग्रह होता की, परवानगीशिवाय वापर हीसुद्धा स्वतंत्र कायदेशीर चूक आहे.
इंटरमीडियरी कंपन्यांची कोर्टातील अडचण
सुनावणीदरम्यान कोर्टाने एका इंटरमीडियरी कंपनीला विचारले की, जर कुणी पर्सनॅलिटी राइट्स उल्लंघनाचा दावा करत तुमच्या वेबसाइटवरील उत्पादनांविरोधात थेट तक्रार केली, तर तुमची पॉलिसी काय आहे? त्यावर इंटरमीडियरीच्या वकिलाने सांगितले की, संबंधित लिंक्स आता ‘इनअॅक्टिव्ह’ आहेत आणि तक्रारींवर “केस-टू-केस” पद्धतीने कारवाई केली जाते. त्यांच्याकडे याबाबत स्पष्ट लिखित धोरण नाही असल्याचंही त्यांनी मान्य केलं.
अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी यापूर्वी दाखल केलेले केसेस
सलमान खान हे पर्सनॅलिटी राइट्सचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी कोर्टात जाणारे पहिले सेलिब्रिटी नाहीत. यापूर्वी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, नागार्जुन, अनिल कपूर, जैकी श्रॉफ, करण जोहर, श्री श्री रविशंकर, सद्गुरू जग्गी वासुदेव आणि इतर अनेकांनीही आपले व्यक्तिमत्त्व हक्क सुरक्षित करण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली आहे. सलमान खानच्या पर्सनॅलिटी राइट्सवरील हा निर्णय सेलिब्रिटींच्या डिजिटल संरक्षणासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. सोशल मीडियावर वाढत चाललेला अवैध वापर, AI–एडिटेड फोटो, अनधिकृत मर्चेंडाइज विक्री आणि ट्रेडमार्क उल्लंघन या सर्वांवर येणाऱ्या काळात अधिक कठोर कारवाईची अपेक्षा केली जात आहे.











