सोनम बेवफा! पतीच्या हत्येवेळी आणि नंतर कुठे गेली होती सोनम? गायब होण्यापासून सापडेपर्यंतची संपूर्ण कहाणी

Smita Gangurde

इंदूर – इंदूरहून ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा आणि त्यांची पत्नी सोनम रघुवंशी गुवाहाटीत कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर, हनिमूनसाठी मेघालयच्या शिलाँगला रवाना झाले होते. सोनमचं तिच्या सासूशी म्हणजेच राजाच्या आई उमाशी अखेरचं बोलणं 23 मे रोजी झालं होतं.

सासूशी बोलताना सोमनला दम लागल्याचं जाणवत होतं. याचं कारण सासू उमानं सोनमला विचारलं. त्यानंतर संपूर्ण परिवाराचा सोनम आणि राजाशी संपर्क तुटला होता. त्यानंतर 11 दिवसांनी राजाचा मृतदेह सापडला होता आणि सोनम बेपत्ता झाली होती.

सोनमचा पहिला क्ल्यू कुठे मिळाला?

सोनमच्या तपास मोहिमेत गुगल लोकेशननं ती कुठे आहे याचा पहिला क्ल्यू मिळाला. बेवारस अवस्थेत सापडलेली स्कूटी आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे तपास पुढे सरकला. अनेक दिवसांच्या शोध मोहिमेनंतर राजाचा मृतदेह सापडला त्यानंतर १७ दिवसांनी सोनम उत्तर प्रदेशातील गाजीपूर परिसरात एका ढाब्यावर संशयास्पद परिस्थितीत सापडली.

सोनमनं सुपारी देऊन राजाची हत्या केल्याचा आरोप करण्यात येतोय. तर सोनमनं अपहरण आणि लुटीवेळी राजाची हत्या झाल्याचा दावा केलाय.

लग्नानंतर 10 दिवसांनी हनिमूनचा प्लॅन

राजा इंदूरमध्ये ट्रान्सपोर्ट व्यावसायिक होता. 11 मे रोजी त्याचा विवाह सोनमसोबत झाला. राजा आणि सोनम लग्नानंतर 10 दिवस घरी राहिले आणि त्यानंतर त्यांनी हनिमूमनला मेघालयात जाण्याचा प्लॅन केला. 20 मे रोजी इंदूरहून बंगळुरुमार्गे ते गुवाहाटीत पोहचले. तिथं दोघांनी एकत्रित कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. तिथून 21 मे रोजी ते शिलाँगला पोहचले. तिथं त्यांनी एका हॉटेलात रुम घेतली. त्यानंतर 22 तारखेला ते सोहराला जाण्यासाठी निघाले. सोहरा पोलीस ठाण्याच्या जवळच एका हॉटेलमध्ये रुम घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र हॉटेलात जागा मिळाली नाही.

त्यांनी हॉटेलात सामान ठेवलं आणि तिथून ते डबल डेकर हे पर्यटन स्थळ पाहण्यासाठी गेले. त्यांनी त्यांच्यासोबत एक गाईडही केला होता. 22 मेला तिथं थांबून 23 मेला ते पुन्हा परतणार असा प्लॅन होता.

शिलाँगला जाण्याचं तिकिट सोनमनंच बुक केलं होतं. 6 ते 7 दिवसांची टूर असल्याचंही तिनं सासूला सांगितलं होतं. पण परत येण्याचं तिकीट तिनं बुक केलं नव्हतं.

23 मेला काय घडलं?

23 मे रोजी राजा आणि सोनम शिलाँगला परतले. त्याच दिवशी सोनम आणि तिच्या सासूचं अखेरचं बोलणं झालं होतं. फोनवर सोनमला दम लागल्याचं लक्षात येत होतं. नंतर फोन करते म्हणून सोनमनं फोन कट केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सासूनं मुलाला फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नव्हता. 24 मे पासून दोघांचेही फोन बंद झाल्यानंतर कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. संपर्क होत नसल्यानं सोनमचा भाऊ आणि राजाचा भाऊ असे दोघेही शिलाँगला दाखल झाले.

शिलाँगमध्ये गेल्यावर चौकशीत सोनम आणि राजा हे दोघंही मावलखियात गावात आले होते. तिथे अँक्टिव्हा भाड्यानं घेऊन नोग्रियात गावाच लिव्हिंग रुट ब्रिज पाहण्यासाठी गेले. एक रात्र त्यांनी त्याच परिसरात एका होम स्टेमध्ये मुक्काम केला होता. दुसऱ्या दिवशी मावलखियातकडे परतणार असल्याचं सांगत त्यांनी चेकआऊट केलं.

24 मे रोजी या दोघांची एक्टिव्हा सोहराला जाण्याच्या रस्त्यावर बेवारस अवस्थेत सापडली. एका दरीजवळ असलेल्या कॅफेबाहेर ही अॅक्टिव्हा उभी होती. याच परिसरात ओरसा नावाचं एक रिसॉर्टही आहे, गुन्हेगारांचा अड्डा अशी या रिसॉर्टची ओळख आहे.

50 पेक्षा जास्त पोलिसांकडून तपास

राजा आणि सोनम दाम्पत्य हरवल्याची तक्रार आल्यानंतर पोलीस सक्रिय झाले. या दाम्पत्याच्या मोबाईलचं अखेरचं लोकेशन मावलाखाइट गावाच्या आसपास मिळालं होतं. त्यानंतर या दोघांच्या तपासासाठी पोलिसांच्या पाच टीम तयार करण्यात आल्या, त्यात स्थानिकांचाही सहभाग होता.

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडूनही दखल

27 मे रोजी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या प्रकरणी मेघालयचे मुख्यमंत्री कॅमराड संगमा यांना फोन केला. मध्य प्रदेशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मेघालय प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचे आदेश देण्यात आले. केंद्र सरकार आणि केंद्रीयी गृहमंत्री अमित शाह यांच्या कानावरही हा सगळा प्रकार गेला.

2 जूनला राजाचा मृतदेह सापडला

29 मे ते 1 जून या काळात मुसळधार पावसामुळे सर्च ऑपरेशनमध्ये अडथळा निर्माण झाला. 1 जूनला पुन्हा तपास सुरु झाला. 2 जूनला म्हणजे 11 दिवसांनी एका खोल दरीत राजाचा मृतदेह पोलिसांना सापडला. राजा रघुवंशी यांची हत्या झाड कापण्याच्या हत्यारानं करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. मात्र या सगळ्यात सोनम बेपत्ताच होती.

सोनमचं रक्तानं माखलेलं जॅकेट सापडलं

3 जूनला पोलीस मॉकमा गावात जंगलात तपास करत असताना एक जॅकेट त्यांना सापडलं. या जॅकेटवर रक्ताचे डाग होते. 4 जून रोजी राजाचा मृतदेह इंदूरमध्ये आणण्यात आला. अंत्यसंस्कारानंतर राजाचे भाऊ विपिन यांनी अपहरण आणि हत्येचा संशय व्यक्त केला. या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली. मेघालय पोलीस प्रकरण दाबत असल्याचा आरोपही करण्यात आला. पुढच्या दोन तीन दिवसात राजा आणि सोनमचे नवनवे सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही केंद्रीय गृहमंत्री आणि मेघालयच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती केली.

17 दिवसांनंतर सोनम सापडली

या सगळ्या घटनेनंतर 17 दिवसांनी सोनम उत्तर प्रदेशातील गाजीपूर परिसरात एका ढाब्यावर सापडली. यानंतर मेघालयच्या पोलीस महासंचालकांनी सोनमचं गुन्हेगारांना सुपारी देऊन राजा यांची हत्या केल्याचा आरोप केलाय. या प्रकरणात 3 आरोपींना अटक केल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

ताज्या बातम्या