बिहारमध्ये सातत्याने मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीचं रण चांगलंच तापलं आहे. अशा परिस्थितीत इंडिया आघाडीकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. राजद, काँग्रेस महाआघाडीकडून मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलं आहे. महाआघाडीने राजदचे प्रमुख आणि माजी मंत्री तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवले आहे. बिहार विधानसभा 2025 साठी महाआघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून तेजस्वी यादव यांचे नाव घोषित केल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार
बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज महाआघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी आगामी निवडणुकांसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यानुसार, राजदचे नेते तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील आणि विकासशील इंसान पार्टी (वीआईपी) चे प्रमुख मुकेश सहनी उपमुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे, बिहारमध्ये महाआघाडीकडून दोन महत्त्वाच्या पदासाठी नावे जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसला काय मिळणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच, बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार आल्यास एनडीएप्रमाणेच दोन उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसला देखील उपमुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते किंवा विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसला संधी मिळू शकते.

तेजस्वी यादव काय म्हणाले ?
जेवढी प्रतिक्षा आपल्या सर्वांनी होती, तितकीच प्रतिक्षा मलाही होते, असे म्हणत तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्रीपदासाठी नाव घोषित केल्यानंतर महाआघाडीतील सर्वच पक्षांचे आभार मानले. राज्यातील डबल इंजिनवालं एनडीए सरकार भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीमध्ये अडकून पडलं आहे. आता, नवयुवकांसह नवा बिहार घडवायचा आहे, या सत्ताधाऱ्यांना उखडून फेकायचं आहे, असेही तेजस्वी यादव यांनी म्हटले.
बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम
मतचोरीचे गंभीर आरोप, राज्य सरकारनं जाहीर केलेल्या अनेक योजना, महिलांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्यात आलेले पैसे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बिहारमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होईल. ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान घेतलं जाईल. १४ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षातील राष्ट्रीय जनता दल यांनी दोन टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे भाजप हा सत्तेतला, तर राजद हा विरोधी बाकांवरील सर्वात मोठा पक्ष आहे. भाजप आणि राजदचे ७० पेक्षा अधिक आमदार विधानसभेत आहेत. दोन्ही बड्या पक्षांनी केलेली मागणी निवडणूक आयोगानं मान्य केली आहे.
राज्यात एकूण ७.४३ कोटी मतदार आहेत. यामधील ३.९२ पुरुष आणि ३.५० कोटी महिला मतदार आहेत. ७.२ लाख दिव्यांग मतदार आहेत. राज्यातील तरुण मतदारांचा (२० ते २९ वर्षे) १.६३ कोटींच्या घरात आहे. तर पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांची संख्या १४.०१ लाख इतकी आहे.











