राज्यातील महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे खासदार संजय राऊत यांना गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संजय राऊत यांनी पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिले असताना शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत यांनी राजकारणापासून ब्रेक घेणे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवाय शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये देखील सध्या चिंतेचे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळत आहे.
संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड ?
संजय राऊतांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही महिने सार्वजनिक जीवनातून दूर राहावं लागणार आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना गर्दीत मिसळण्यास आणि बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मी लवकरच बरा होऊन नवीन वर्षात सर्वांना भेटेन, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.

— Sanjay Raut (@rautsanjay61) October 31, 2025
राऊतांची गैरहजेरी; ठाकरेंसाठी डोकेदुखी
संजय राऊत हे शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जातात. 2019 साली उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केल्यापासून संजय राऊत हे सातत्याने प्रभावीपणे ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. ठाकरे गटाचा अजेंडा प्रभावीपणे मांडण्यात आणि विरोधकांवर आगपाखड करण्याचे काम संजय राऊत एकहाती करत असतात.
संजय राऊत यांनी गेल्या काही वर्षांमध्ये ठाकरे गटासाठी अक्षरश: एकहाती खिंड लढवली आहे. दररोज सकाळी नियमाने पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडतात. अशा परिस्थितीत ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊत सार्वजनिक, राजकीय जीवनापासून दूर राहिले, तर याचा मोठा फटका खरंतर ठाकरेंच्या शिवसेनेला बसणार आहे.











