आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाबाबत एक मोठा दावा केला आहे. महापालिका निवडणुकीच्या नंतर एकनाथ शिंदेंना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांनी त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा आदेश दिला असल्याची माहिती संजय राऊत यांनी सांगितली आहे. राऊतांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांची जमिनीवरील ताकद नक्की किती आहे ते मोदी शहा यांना माहिती आहे. मराठी आणि महाराष्ट्र विरुद्ध मोदी शहा यांनी एकनाथ शिंदेना वापरून घेतले. महानगरपालिका निवडणुका झाल्यावर तुम्हाला तुमचा पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागेल असा सल्ला नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

शिंदेंच्या दिल्लीवारी वर टीका
एकनाथ शिंदे यांच्या सततच्या दिल्लीवारीवर सुद्धा राऊतानी टीका केली. जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये पक्ष आणि चिन्ह कुणाचं? यावर सुनावणीची तारीख जवळ येते तेव्हा एकनाथ शिंदे यांचे पाय लटपटतात आणि मग ते दिल्लीत जातात. कधी अमित शाहांना भेटतात तर कधी मोदींना भेटतात. बाकी त्याच्यामध्ये काहीही नाही. पक्ष आणि चिन्ह कुणाचं? यावर सुनावणीची तारीख जवळ आली की, त्यांच्या भेटीगाठी वाढतात. ते रडगाणं गातात, छाती पिटतात आणि परत येतात. मात्र कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही कायद्याच्या आधारे एकनाथ शिंदे सुप्रीम कोर्टात आपला बचाव करू शकत नाहीत हे सगळ्यांना माहिती आहे. तसा प्रयत्न झाला तर या देशातील जनतेचा नव्हे तर जगाचा भारतीय न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल, असे सुद्धा संजय राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत पुढे म्हणाले, एकनाथ शिंदेंना त्यांच्या मालकांशी चर्चा करावी लागते. जेव्हा ते शिवसेनेत होते तेव्हा मातोश्रीवर किंवा शिवसेना भवनावर त्यांना यावं लागायचं. आता त्यांनी चोरलेला पक्ष असल्यामुळे त्यांना इतिहास माहीत नाही. शिवसेना हा एक प्रादेशिक पक्ष आहे. प्रादेशिक पक्षाचे नेतृत्व हे राज्यांमध्येच असतात. प्रादेशिक पक्षांची मुख्य कार्यालये राज्यातच असतात. ती दिल्लीत नसतात. चंद्राबाबू नायडू त्यांच्या पक्षाचा काम घेऊन दिल्लीत जात नाहीत. आता यांचे मालक दिल्लीत असल्यामुळे त्यांना तिकडे जावं लागतं, असा टोला राऊतानी एकनाथ शिंदेंना लगावला.











