बीडमधील वाढती गुन्हेगारी कृत्ये चिंता वाढवणारी आहेत. आता परळीमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बीड जिल्ह्यातील परळी रेल्वे स्थानकावर सहा वर्षांच्या लहान मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे. संबंधित चिमुकलीवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे परळी स्थानक परिसरात यावेळी जमावाने मात्र मोठा गोंधळ घातल्याचे चित्र पाहायला मिळाले.
परळी स्थानकात चिमुकलीवर अत्याचार
पंढरपूर येथून एक कुटुंब मुलांसह परळी रेल्वे स्थानकावर आले होते. दुपारी साधारण तीनच्या सुमारास त्यांनी रेल्वे स्टेशनवरच जेवण करून थोडा वेळ विश्रांती घेतली. त्याच वेळी एका नराधमाने सहा वर्षांच्या चिमुकलीला फसवून स्थानकावरील उड्डाणपुलाकडे नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या धक्कादायक प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून अत्याचारानंतर आरोपी पसार झाला आहे. यावेळी जमावाने काही काळ आरोपीचा शोध घेतला.

चिमुकली मोठ्याने रडू लागल्यावर परिसरातील प्रवाशांचे लक्ष तिच्याकडे गेले. आवाजाच्या दिशेने धाव घेतल्यावर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. उपस्थितांनी सांगितले की, त्या वेळी चिमुकलीला रक्तस्त्राव होत होता. घटनेची माहिती मिळताच परळी पोलिस ठाण्याचे निरीक्षक धनंजय ढाणे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.











