नवी दिल्ली- अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन या कंपनीच्या विरोधात 2 हजार कोटींपेक्षा जास्त बँक फसवणूक प्रकरणी सीबीाआयनं गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयनं अनिल अंबानी यांची कंपनी आणि इतर ठिकाणांवर शनिवारी छापे टाकलेत. हा बँक घोटाळा स्टेट बँक ऑफ इंडियाशी संबंधित आहे.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत दिलेल्या एका लेखी उत्तरात याबाबतची माहिती दिली होती. एसबीआयनं या प्रकरणात सीबीआयमध्ये तक्रार अर्ज दाखल केला होता. यासह बँकेनं अनिल अंबानी यांच्याविरोधात व्यक्तिगत पातळीवर दिवाळं निघाल्याप्रकरणीही कारवाई सुरु केली आहे. ही कारवाई मुंबईतील एनसीटीएलमध्ये प्रलंबित आहे.

यापूर्वी ईडीनंही केली होती छापेमारी
यापूर्वी 23 जुलैला ईडीनं अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित 35 पेक्षा जास्त ठिकाणांनर छापेमारी केली होती. ही छापेमारी येस बँकेशी संबंधिक 3000 कोटींच्या कर्ज फसवणुकीप्रकरणी करण्यात आली होती.
अनिल अंबानी यांच्याविरोधात सीबीआयची कारवाई कशासाठी?
हे सगळं प्रकरण अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपच्या कंपन्यांची संबंधित आहे. 2017 ते 2019 काळात येस बँकेकडून कंपनीला 2 हजार कोटींचं कर्ज देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर कंपनीनं या कर्जाची परतफेड केलेली नाही. हा घोटाळा मानण्यात आला कारण कंपनीनं कर्जाने घेतलेल्या पैशांचं योग्य ठिकाणी विनियोग केला नव्हता तसंच नियमांचंही पालन करण्यात आलं नव्हतं.
सीबीआयची नेमकी काय भूमिका?
या सगळ्यात सीबीआयनं यापूर्वी दोन एफआयआर दाखस केल्या आहेत. ही दोन्ही प्रकरणे येस बँकेद्वारे रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड या दोन कंपन्यांना देण्यात आलेल्या वेगवेगळ्या कर्जांबाबत आहेत. या दोन्ही प्रकरणात सीबीआयनं येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांचं नाव घेतलं आहे.
या सगळ्या प्रकरणात नॅशन हाऊसिंग बँक, सेबी, नॅशनल फायनान्सिंग रिपोर्टिंग अथॉरिटी आणि बँक ऑफ बडोदा या यंत्रणांनी याबाबतची माहिती ईडीला दिली होती. त्यानंतर या प्रकरणात ईडीही चौकशी करीत आहे.
तपासात आत्तापर्यंत काय समोर आलं?
ईडीनं दिलेल्या या अहवालात हा एक सुनियोजित प्लॅन होता, असं म्हटलं आहे. शेअर होल्डर्स, गुंतवणूकदार आणि इतर संस्थांना चुकीची माहिती देत पैसे हडप करण्यात आले आहेत. या तपासात अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. कमकुवत आणि व्हेरिफिकेशन न करता कंपन्यांना कर्ज देण्यात आलीयेत. अनेक कंपन्यांत एकच संचालक आणि पत्त्याचा उपयोग करण्यात आलाय. कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रेच दिली गेलं नसल्याचं समोर आलंय. जुनी कर्ज फेडण्यासाठी नवी कर्ज घेण्यात आल्याचंही समोर आलंय.
अनिल अंबानींच्या कंपनीवर काय आरोप?
काही दिवसांपूर्वी एसबीआयनं अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन आणि अनिल अंबानी यांना फ्रॉड घोषित केलंय. एसबीआयनं सांगितलंय की कंपनीनं 32 हजार 580 कोटींच्या कर्जाचा दुरुपयोग केला. यातील 13,667 कोटी रुपये इतर कंपन्यांची कर्ज फेडण्यासाठी वापरण्यात आले. 12692 कोटी रुपये रिलायन्स ग्रुपच्या दुसऱ्या कंपन्यांना देण्यात आले.
या सर्व प्रकरणांची तक्रार सीबीआयकडं करण्यात आली आहे, त्याबाबतची प्रक्रिया सुरु आहे. यासह अनिल अंबानी यांच्या विरोधात वैयक्तिक दिवाळखोरी प्रकरणी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्येही कारवाई सुरु आहे.











