पुण्याच्या कोल्हेवाडी परिसरात दोन गटातील वादातून गोळीबार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अलीकडच्या काळात पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या कोल्हेवाडी परिसरात काही गावगुंडांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.

अलीकडच्या काळात पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. चोरी, घरफोडी, खून, फसवणूक आणि सायबर गुन्हे यासारख्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. विशेषतः तरुणांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढताना दिसत असून त्यामागे बेरोजगारी, व्यसनाधीनता आणि सोशल मीडियाचा गैरवापर हे कारणीभूत ठरत आहेत. आता दिवसाढवळ्या कोल्हेवाडी परिसरात काही गावगुंडांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. पोलिसांचे नियंत्रण राहिले आहे की नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

दिवसा-ढवळ्या गोळीबार; नागरिक भयभीत

सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी चौकात सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास अचानक तणाव निर्माण झाला. एका किरकोळ कारणावरून दोन टोळ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि काही क्षणातच हाणामारी सुरू झाली. विशेष म्हणजे, यावेळी दोघांनी गावठी पिस्तूल काढून थेट गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाद सुरू झाल्यानंतर तिथे तणाव वाढत गेला आणि दोन पिस्तुलांमधून तीन वेळा गोळ्या झाडण्यात आल्या.

सुदैवाने कोणालाही गोळी लागली नाही. या घटनेनं एकच गोंधळ उडाला आणि स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली.हा सर्व प्रकार मुख्य रस्त्यावर घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा तपास सुरू असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गुन्हेगारांना कायद्याची भीती उरली नाही?

अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. पोलिसांनी गस्त वाढवणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि जनजागृती मोहिमा राबवणे आवश्यक आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे. समाज आणि प्रशासन यांच्यात समन्वय राहिल्यासच पुण्यातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणता येईल. असे मत व्यक्त केले जात आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News