मुंबईत कॅबमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग, २९ वर्षीय आरोपी ड्रायव्हरला अटक

ही घटना प्रभात कॉलनीहून गोळीबार नाका येथे कॅबमधून प्रवास करत असताना घडली. प्रवासादरम्यान आरोपीने पीडित मुलीला वाईटरित्या स्पर्श केला, ज्यामुळे ती घाबरली.

Mumbai Crime : मुंबईतील वाकोला परिसरात एका २२ वर्षीय विद्यार्थिनीचा कॅबमध्ये विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी २९ वर्षीय कॅब चालक अनिश आशिक अली शेख याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (BNS) संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना प्रभात कॉलनीहून गोळीबार नाका येथे कॅबमधून प्रवास करत असताना घडली. प्रवासादरम्यान आरोपीने पीडित मुलीला वाईटरित्या स्पर्श केला, ज्यामुळे ती घाबरली. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ विद्यार्थिनीने घटनेच्या काही दिवसांनी तिच्या कुटुंबाला याबद्दल सांगितले. त्यानंतर कुटुंबाने पीडितेला वाकोला पोलीस ठाण्यात नेले आणि तक्रार दाखल केली.

सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीचा तपास लावला

पोलीसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. आरोपीचा कोणताही कायमस्वरूपी पत्ता नसल्यामुळे त्याला पकडणे कठीण होते. मात्र, पीडितेने दिलेल्या ठिकाणांच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला मुंबईतील जोगेश्वरी परिसरातून अटक करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा गंभीरतेने तपास करत आहेत.

यापूर्वीही घडली आहे अशीच घटना

अशीच आणखी एक घटना समोर आली आहे, जिथे २३ वर्षीय उबर ड्रायव्हर श्रेयांश पांडे याला दादर ते पवई प्रवासादरम्यान १४ वर्षीय मुलीशी कथित छेडछाड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. श्रेयांश पांडे हा संपूर्ण प्रवासात पिडीत मुलीकडे सतत बघत राहिला, तसेच, नेहमीच्या मार्गाऐवजी विविध छोट्या गल्ल्यांमधून गाडी नेली. तिचा फोन बघण्याच्या बहाण्याने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. सोबतच तो तिला वारंवार सिगरेट हवी आहे का? अशी विचारणा करत राहिला.

यानंतर गाडी बिघडल्याचा दावा करत चालकाने एका निर्जन ठिकाणी गाडी थांबवली. मुलीच्या कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चालकाविरुद्ध बीएनएसच्या कलम ७५ (लैंगिक छळ) आणि ७९ (महिलेचा विनयभंग किंवा अपमान करण्यासाठी शब्द, हावभाव किंवा कृती) आणि पोक्सो कायद्याच्या कलम १२ (लैंगिक छळासाठी शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल केला.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News