सांगली– मार्कांच्या स्पर्धेतून पोटच्या मुलीचा जीव एका शिक्षक पित्यानं घेतल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यात घडलीय. नीटच्या परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून संतापलेल्या शिक्षक पित्यानं या मुलीला इतकी जबर मारहाण केली की त्यात १७ वर्षांच्या मुलीचा अंत झाला.
साधना भोसले असं या मृत्यमुखी पडलेल्या 17 वर्षांच्या मुलीचं नाव आहे. मार्कांच्या स्पर्धेत लढता लढता, साधनाला जीव गमवावा लागला. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करणारे तिचे वडील हे पेशानं शिक्षक आहेत.. अनेक मुलांचं भवितव्य घडवण्याचं काम ते करतात, आणि त्यांनी हा अविचार केलाय, हे जास्त हादरवणारं आहे.

नेमकं काय घडलं?
सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावातली ही घटना आहे. साधना भोसले आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या निवासी स्कूलमध्ये बारावीला विज्ञान शाखेत शिकत होती. हुशार विद्यार्थिनी असा साधनाचा नावलौकिक होता. तिचे वडील नेलकरंजी गावातील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये पीटीचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. साधनाला NEET चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं वडिलांना राग आला. साधनाला शेवटच्या परीक्षेत 720 पैकी 173 गुण मिळाले. कमी गुण मिळाल्यानं शिक्षक पिता आणि मुलीमध्ये जोरदार वाद झाला. तुम्हालाही कमी मार्क मिळाले होते. तुम्ही कुठे कलेक्टर झालात, शिक्षकच झालात ना, मुलीकडून उलट शब्द ऐकल्यानंतर बापाचा संताप झाला. आणि त्याने मुलीला जबर मारहाण केली. तिच्या पोटात लाथा घातल्या. मुलगी त्या दिवशी बेशुद्ध अवस्थेत घरात पडून होती. दुसऱ्या दिवशी तिचे वडील योग दिनासाठी सकाळीच निघून गेले. मुलगी शुद्धीवर येत नसल्याचं दिसतास त्यांनी मुलीला रुग्णालयात नेलं. मुलगी बाथरूममध्ये पडल्याचं सांगितलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदनादरम्यान खरा प्रकार उघड झाला. मुलीनं उलट वाद घातल्यानं संतापलेल्या शिक्षक पित्यानं केलेल्या मारहाणीत साधनाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
पित्याविरोधात आईकडून पोलिसांत तक्रार
या घटनेनंतर हादरलेल्या साधनाच्या आईनं तिच्या पतीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला साधनाला इयत्ता दहावीच्या परीक्षेत 94 टक्के मार्क्स मिळाले होते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत तिच्याकडून पालकांच्या अपेक्षा उंचावलेल्या होत्या. वडिलांच्या अपेक्षांचं वाढतं ओझं साधनाला नीटच्या परीक्षेत पेलवलं नाही, आणि हा प्रसंग ओढवला.
अपेक्षांचं जीवघेणे ओझं
केवळ साधनाच नाही, तर या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलले अनेक विद्यार्थी आजूबाजूला आहेत. NCRB अहवाल-2024 नुसार विद्यार्थ्यांच्या आत्महत्या 4 टक्क्यांनी वाढल्या आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशात विद्यार्थी आत्महत्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात 2021 मध्ये 1,764 विद्यार्थी आत्महत्या तर 2022मध्ये हीच संख्या 1,834 पर्यंत पोहचलीय. महाराष्ट्रात शैक्षणिक दबावामुळे विद्यार्थी आत्महत्यांचं प्रमाण अधिक असल्याचं अहवाल सांगतो. मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरी भागात विद्यार्थी आत्महत्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. हे सगळं कधी थांबणार, हा खरा प्रश्न आहे.











