दिल्लीत चक्क महिला खासदाराची सोनसाखळी चोरांनी पळविली; खासदार आर. सुधांचे थेट गृहमंत्र्यांना पत्र

Rohit Shinde

भारतात महिला खासदार सुरक्षित नसतील, त्यांचे दागिने सुरक्षित नसतील तर इतर महिलांचे काय होणार, असा सवाल एका घटनेमुळे उपस्थित राहिला आहे. दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काँग्रेस खासदार यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार समोर आला. सुरक्षा व्यवस्था असलेल्या भागात चोरांनी एका खासदाराची सोन्याची साखळी चोरल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आर सुधा यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट गृहमंत्री अमित शाहांनाच या प्रकरणात पत्र लिहिले. नेमकं काय घडलं, ते सविस्तर जाणून घेऊ…

आर.सुधांसोबत नेमकं काय घडलं?

दिल्लीतील सर्वात सुरक्षित क्षेत्र मानल्या जाणाऱ्या चाणक्यपुरी भागात सोमवारी सकाळी ही घटना घडली आहे. आर सुधा या तामिळनाडूतील मयिलादुथुराई लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने त्या दिल्लीत आहेत. आर सुधा या सकाळी मॉर्निंग वाकसाठी बाहेर पडल्या होत्या. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून त्यांच्याजवळ आली आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून पळून गेली. यावेळी आर सुधा यांच्यासोबत आणखी एक एक महिला खासदार होत्या. यावेळी झालेल्या झटापटीत आर सुधा यांच्या गळ्याला जखम झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, त्यांच्यासोबत असलेल्या खासदारांनी मदतीसाठी ओरड केल्यानंतर लोक घटनास्थळी जमा झाले.

आर.सुधांचे थेट गृहमंत्र्यांना पत्र

आर सुधा यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटलं की, चाणक्यपुरी परिसर हा मोठी सुरक्षा असलेला परिसर आहे. या परिसरात विविध देशांचे दूतावासांचे आणि काही महत्त्वाचे सरकारी निवासस्थान आहेत. संसद भवन, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान निवासस्थान देखील जवळच आहे. मात्र, तरीही त्या भागात एका खासदाराची सोन्याची साखळी भरदिवसा चोरीला जात आहे. त्यामुळे जर महिला खासदार येथे सुरक्षित नसतील तर सामान्य महिला कशा सुरक्षित राहतील? असा सवाल सुधा यांनी विचारला.

या निमित्ताने महिला सुरक्षेचा प्रश्न मात्र पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आला आहे.

ताज्या बातम्या