राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. वाढत्या छेडछाड, बलात्कार, अत्याचार आणि घरगुती हिंसाचाराच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहर असो वा ग्रामीण भाग, महिलांना अनेक ठिकाणी सुरक्षिततेचा अभाव जाणवतो. गडचिरोलीच्या देसाईगंजमधून आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमीष दाखवून 23 वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण करत अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी देसाईगंज शहरातील एक नामांकित सराफ व्यापारी आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.
देसाईगंजमध्ये नेमकं काय घडलं?
सुनील पंडलिक बोके (48) आणि अक्षय कुंदनवार (32) अशी आरोपींची असून दोघेही देसाईगंजचे रहिवासी आहेत. पीडित तरुणीची सराफ व्यवसायिकासोबत मैत्री जमली होती, त्यातून लग्नाचे अमिष दाखवत आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. आरोपी बोके याचे गांधी वॉर्ड परिसरात राधा ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. या दुकानात कामाच्या निमित्ताने पीडित तरुणीचा संपर्क सुनील बोके याच्याशी आला. त्यानंतर सुनीलने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी जवळीक साधली. तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने विविध ठिकाणी शारीरिक अत्याचार केले.

तरूणीची तक्रार; 2 आरोपी अटकेत
सराफाकडून होणाऱ्या सततच्या मानसिक त्रासामुळे आणि धमक्यांमुळे पीडितेने त्याच्याशी संबंध तोडले आणि मोबाईल क्रमांक ब्लॅक केला. त्यानंतर, मात्र सुनीलने त्याचा मित्र अक्षय कुंदनवार याच्यामार्फत पीडितेवर पुन्हा दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तसेच, मुलीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देखील दिली. त्यानंतर, पीडितेने जिल्ह्यातील देसाईगंज पोलिसांत आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. यानिमित्ताने कायद्याची अंमलबजावणी काटेकोर व्हावी, गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी याची जनतेची मागणी आहे. महिलांना शिक्षण, स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि कायदेशीर मदतीची सुविधा मिळाली पाहिजे. समाजात महिलांविषयी आदर आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज आहे. सरकार, पोलीस प्रशासन आणि समाज सर्वांनी मिळून महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलणे अत्यावश्यक आहे.











