बॉलिवूडची बहुचर्चित फिल्म ‘धुरंधर’ प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर कथानकातील काही भागांवरून बलुच समुदायामध्ये असंतोषाची लाट उसळली आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील घडामोडींवर आधारित आणि 1999 च्या कंधार हायजॅक प्रकरणाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात दाखवलेल्या काही दृश्यांमुळे बलुच कार्यकर्ते आणि प्रतिनिधींनी खुली नाराजी व्यक्त केली आहे.
बलुच समाज का नाराज आहे?
चित्रपटात आयबी चीफ अजय सान्याल (आर. माधवन) यांच्या नेतृत्वाखालील ‘ऑपरेशन धुरंधर’ची कथा रेखाटली आहे. यात हमझा (रणवीर सिंह) पाकिस्तानमध्ये घुसखोरी करून कुख्यात बलुच गँगस्टर रहमान डकैत (अक्षय खन्ना) पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसतो. तथापि, याच मांडणीवर बलुच समाजाने तीव्र आक्षेप घेतला आहे.

मीर यार बलुच यांची संतप्त प्रतिक्रिया
बलुच समुदायाचे प्रतिनिधी, लेखक व मानवाधिकार कार्यकर्ते मीर यार बलुच यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर विस्तृत प्रतिक्रिया देत ‘धुरंधर’ने बलुचिस्तानचे चित्रण अत्यंत चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप केला. त्यांनी लिहिले आहे की, “चित्रपटात बलुचिस्तान आणि भारताचे संबंध नकारात्मक दाखवले गेले आहेत. आम्ही स्वातंत्र्यासाठी लढणारे बलुच लोक आहोत, गँगस्टर नाही. 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा आम्ही कधीही उत्सव साजरा केला नाही, कारण पाकिस्तानप्रायोजित दहशतवादाचे आम्हीही बळी आहोत. आम्ही कधीही ‘अल्लाह-ओ-अकबर’चे इस्लामी घोष नाही देत, तसेच भारतीय हितांना हानी पोहोचवण्यासाठी आयएसआयशी हातमिळवणी करत नाही.”
मीर यार बलुच यांनी पुढे आरोप केला की, चित्रपटाने बलुच स्वातंत्र्य चळवळीच्या लढवय्यांना चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. “आम्ही भारतविरोधी गटांना शस्त्रं विकतो असे दाखवणे कल्पित आणि अपमानास्पद आहे. आमच्याकडे नेहमीच साधनसामग्रीची कमतरता असते, अन्यथा पाकिस्तानची कब्जाधारी सेना आजवर पराभूत झाली असती.”
आमच्या संस्कृतीत विश्वासघात हा शब्दच नाही”
मीर यार बलुच यांनी चित्रपटातील एका संवादावरही कडाडून टीका केली. “एसपी चौधरी असलम यांनी म्हटले की ‘मगरमच्छावर विश्वास ठेवू शकतो पण बलुचांवर नाही’. हा संवाद आमच्या संस्कृतीचा अपमान आहे. आमच्या परंपरेत ‘एक गिलास पाण्याची किंमत शंभर वर्षांची वफा’ अशी म्हण आहे. आम्ही विश्वासू लोक आहोत; मदत करणाऱ्याप्रती कधीच विश्वासघात करीत नाही.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, बलुच इतिहास, संस्कृती आणि भारताशी असलेल्या ऐतिहासिक नात्यांवर पुरेसा अभ्यास न करता हा चित्रपट बनवला गेला आहे, ज्यामुळे चुकीची प्रतिमा तयार होत आहे.
खरी कथा सांगणारा नवीन चित्रपट यायला हवा”
पोस्टच्या शेवटी मीर यार बलुच यांनी आशा व्यक्त केली की,
*“एक दिवस अशी फिल्म बनावी ज्यात बलुच-भारत मैत्री, ऐतिहासिक बंध, परस्पर निष्ठा आणि आमच्या सामाईक शत्रू, पाकिस्तानविरुद्धची लढाई सत्य स्वरूपात दाखवली जाईल.” ‘धुरंधर’वर आलेल्या या आक्षेपांमुळे चित्रपटाच्या कथानकावर नव्याने चर्चा तापली असून मेकर्सकडून याबाबत काय प्रतिक्रिया येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.