२५२ कोटींच्या मेफेड्रोन ड्रग तस्करी प्रकरणात नवीन घडामोडी समोर येत आहेत. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याची चौकशी झाल्यानंतर आता त्याचा मित्र आणि प्रसिद्ध इन्फ्लुएंसर ओरहान अवत्रमणी उर्फ ओरी याचीही मुंबई पोलिसांनी तब्बल आठ तास चौकशी केली आहे. मुख्य आरोपी मोहम्मद सलीम शेख यांच्या चौकशीत सिद्धांत आणि ओरी या दोघांची नावे समोर आली होती. सलीमने दिलेल्या माहितीनुसार, देश-विदेशातील रेव पार्ट्यांमध्ये ओरीचा सहभाग असल्याचा संशय निर्माण झाला आहे. त्यानुसार त्याची सखोल चौकशी करण्यात आली.
सलीम शेखकडून काय माहिती मिळाली
मुंबई पोलिसांच्या अँटी-नार्कोटिक्स सेलने २५२ कोटी रुपयांच्या ड्रग जब्ती प्रकरणात तपास अधिक वेगाने सुरू केला आहे. मुख्य आरोपी सलीम शेखकडून मिळालेल्या माहितीवरून काही सेलिब्रिटी, फॅशन क्षेत्रातील व्यक्ती, एक राजकीय नेता आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या एका नातेवाईकाचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. या सर्व बाबींची स्वतंत्र पडताळणी करण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. २६ नोव्हेंबर रोजी ओरीला समन्स पाठवून त्याचा अधिकृत जबाब नोंदवून घेण्यात आला.

सिद्धांत कपूर याचा या प्रकरणाशी संबंध नव्याने समोर आल्यानंतर त्याच्याकडेही पोलिसांनी काही महत्वाचे प्रश्न विचारले आहेत. सिद्धांतला याआधी २०२२ मध्ये बेंगळुरू येथील ड्रग प्रकरणात ताब्यात घेण्यात आले होते. त्या प्रकरणात पुढे कोणतीही मोठी कारवाई न झाल्याने मुद्दा थंडावला होता. मात्र नव्या तपासात सिद्धांतला पुन्हा बोलावण्यात आले आणि २५ नोव्हेंबर रोजी पाच तास त्याच्याकडून ड्रग पार्ट्यांशी असलेल्या संभाव्य संबंधांविषयी चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, या चौकशीत सिद्धांतने सर्व प्रश्नांना स्पष्ट उत्तरे दिली नसल्याचे सांगण्यात येते.
ओरिच्या चौकशीत काय आढळले
ओरीच्या चौकशीतही परिस्थिती काहीशी अशीच होती. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याने विचारलेल्या बहुतांश प्रश्नांना टाळटाळीची उत्तरे दिली. देश-विदेशातील ड्रग पार्ट्यांमध्ये त्याने सहभाग घेतला होता का, त्याचे मुख्य आरोपी सलीमशी काय संबंध होते, त्याला कोणते सेलिब्रिटी ओळखत होते, या सर्व मुद्द्यांवर त्याचे उत्तर संशयास्पद असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस आता या प्रकरणातील सर्व धाग्यांची सखोल तपासणी करत असून, या नेटवर्कचा विस्तार किती मोठा आहे याची छाननी केली जात आहे.
मुख्य आरोपी सलीम शेखच्या निवेदनात अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावे समोर आली आहेत. यात श्रद्धा कपूर, नोरा फतेही, दिग्दर्शक अब्बास–मस्तान, रॅपर लोका, अलीशा पारकर (दाऊद इब्राहिमचा नातेवाईक) आणि माजी आमदार जीशान सिद्दीकी यांचा समावेश असल्याचे म्हटले गेले आहे. या सर्वांची नावे देश-विदेशातील कथित रेव पार्ट्यांशी जोडली गेली आहेत. मात्र आतापर्यंत प्रत्यक्ष चौकशी फक्त ओरी आणि सिद्धांत कपूर यांच्यापर्यंतच मर्यादित आहे. इतरांनाही नंतर समन्स दिले जाऊ शकतात.
या संपूर्ण प्रकरणात नेमका निकाल कधी लागेल, याबाबत स्पष्टता नाही. पोलिसांनी तपास अद्याप सुरू असल्याचे सांगितले असून सर्व जबाब, डिजिटल पुरावे आणि इतर माहितीची पडताळणी पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही, असे ते म्हणतात. तपासाला काही आठवडे किंवा त्याहून अधिक कालावधी लागू शकतो. आरोप सिद्ध झाल्यास पुढील कायदेशीर कारवाई होऊ शकते. ही चौकशी कुठपर्यंत पोहोचते आणि आणखी कोणती नवी नावे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.