सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटना आजच्या डिजिटल युगात गंभीर समस्या बनल्या आहेत. इंटरनेट आणि मोबाईल बँकिंगच्या वाढत्या वापरामुळे हॅकर्स, फसवे कॉल, खोट्या वेबसाईट्स आणि लिंकद्वारे लोकांची फसवणूक करून पैशांची अफरातफर केली जाते. अनेकदा लोक लालचाला बळी पडून आपली वैयक्तिक माहिती, बँक तपशील किंवा ओटीपी शेअर करतात आणि त्यामुळे त्यांचे नुकसान होते. ही समस्या टाळण्यासाठी सतर्क राहणे, अनोळखी लिंक्सवर क्लिक न करणे, पासवर्ड नियमित बदलणे आणि अधिकृत अॅप्सचाच वापर करणे आवश्यक आहे. शासन आणि बँका देखील जनजागृती करून नागरिकांना सुरक्षिततेबद्दल माहिती देत आहेत.
सायबर फसवणूक; लाखोंचा गंडा
व्हॉट्सअॅपवर बनावट अॅपच्या लिंकद्वारे तब्बल सहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये प्रत्येकी एक प्रकरण नोंदवण्यात आले आहे. अंबरनाथमध्ये एका व्यक्तीच्या मोबाईलवर युनियन बँक ऑफ इंडियाचे बोधचिन्ह असलेला मेसेज आला होता, तर बदलापुरात परिवहन विभागाच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केली गेली. नागरिकांना अशा बनावट संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

फसवणूक नेमकी कशी झाली?
अंबरनाथ पूर्वेतील एका नागरिकाला त्यांच्या कार्यालयात असताना मोबाईलवर युनियन बँक ऑफ इंडियाचे लोगो असलेला व्हॉट्सअॅप संदेश प्राप्त झाला. संदेशानुसार बँकेचे अॅप उघडण्यास सांगितले गेले. यानंतर त्याच्या खात्यातून 4 लाख 98 हजार 993 रुपये वळवण्यात आले. बँकेशी संपर्क साधल्यावर समजले की, मोबाईलवर आलेले अॅप बनावट होते. यानंतर तक्रारदाराने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
बदलापुरातील दुसऱ्या प्रकरणात, तक्रारदाराच्या मोबाईलवर परिवहन विभागाचे एक चलान पाठवण्यात आले. त्याद्वारे गुगल पेच्या माध्यमातून त्याच्या खात्यातून 1 लाख 89 हजार रुपये वळवण्यात आले. फसवणूक लक्षात आल्यावर तक्रारदाराने पोलिसात तक्रार नोंदवली. या प्रकरणी राजा राम, शाबाझ खान, दिपक कुमार शॉ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही प्रकरणांमुळे पोलिसांनी ऑनलाईन फसवणुकीपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बनावट व्हॉट्सअॅप लिंक आणि खोट्या खात्यांद्वारे नागरिकांना फसवले जाते. अशा परिस्थितीत सतर्क राहूनच व्यवहार करण्याची सूचना पोलिसांनी दिली आहे. पोलिसांकडून या संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे.











