हवामान सातत्याने बदलताना दिसत आहे. महाराष्ट्रात देखील सततच्या हवामानातील बदलांमुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीतमध्ये रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी तर दिवसा कडक ऊन असे वातावरण सध्या अनुभवास येत आहे. दक्षिणेतील काही राज्यांमध्ये पावसाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्याचा परिणाम थेट महाराष्ट्रामध्ये जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात सध्या रात्रीच्या वेळीचे तापमान 12 ते 13 अंशांच्या आसपास राहत असून दिवसा तापमान 32 अंशापर्यंत वाढत आहे. हवामानात कमालीची तफावत पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रातील हवामानाची काय स्थिती?
उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने राज्यात थंडी पूर्णपणे ओसरली आहे. राज्यात अंशत: ढगाळ आकाश झाले असून, उन्हाचा चटका आणि उकाडा वाढल्याचे अनुभवायला मिळत आहे. आज 26 नोव्हेंबर रोजी अंशतः ढगाळ हवामानासह तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुणे जिल्ह्यात थंडीचा कडाका अंशत: कमी झाला असून मंगळवारी 31.6 कमाल आणि 17.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. आज कमाल तापमान 31 तर किमान 17 अंशांवर राहील. त्यामुळे गारठा कमी राहणार असून ऐन थंडीत उकाडा जाणवणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमानाचा पारा 14 अंशांच्या वर गेल्याने थंडी गायब झाली आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 2 ते 6 अंशांची वाढ झाली आहे. दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, वाढलेला उकाडा रात्री उशिरापर्यंत कायम राहत आहे. अशीच काहीशी परिस्थिती सध्या मराठवाडा आणि विदर्भात देखील अनुभवास येत आहे. किमान तापमान 13 अंश सेल्सियस तर कमाल तापमान 33 अंशांपर्यंत जाताना दिसत आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर अद्याप टीकून आहे. तर कोकणात दमट आणि उष्ण तापमान अनुभावस येत आहे.
पण, थंडीचा जोर पुन्हा वाढणार !
आठ दिवसांसाठी थंडीचा जोर कमी होणार असून, नागरिकांना गारठ्यापासून थोडा दिलासा मिळणार आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, सध्या बंगालच्या उपसागरात जे वादळ तयार होत आहे, त्याचा थेट परिणाम स्थानिक हवामानावर दिसून येत आहे. या बदलामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग मंदावला आहे, तर त्याऐवजी बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या उष्ण हवेचा प्रवाह वाढला आहे. याचसोबत हवेतील आर्द्रतेतही वाढ झाली आहे. त्यामुळे, आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असून, थंडीचा कडाका कमी राहील.
सध्याची ही स्थिती तात्पुरती आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळेल, परंतु डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून थंडीचा जोर पुन्हा वाढेल. वादळी हवामान स्थिर झाल्यानंतर उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह पुन्हा सुरू होतील आणि तेव्हा खऱ्या अर्थाने कडाक्याची थंडी अनुभवायला मिळेल.











