मराठी शाळांचे ग्रामीण आणि शहरी मुलांच्या जडणघडणीत अत्यंत महत्वाचे योगदान असते. ग्रामीण भागात मराठी शाळा ही शिक्षणाची मुख्य आणि सहज उपलब्ध होणारी साधने आहेत. या शाळांमुळे मुलांना मातृभाषेत शिक्षण मिळते, स्थानिक संस्कृती, परंपरा, मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी यांचे भान मजबूत होते. शहरी भागातही मराठी शाळा विद्यार्थ्यांना भाषिक ओळख, सांस्कृतिक मुळांशी नाळ जोडणारे शिक्षण आणि स्पर्धात्मक वातावरणात आत्मविश्वास देतात. मात्र आता या शाळा आणि शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात दिसत आहे.
600 मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर
शिक्षक समायोजन प्रक्रियेमुळे महाराष्ट्रातील ६०० मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. यामुळे २५,००० विद्यार्थी शाळा सोडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षण संकट आणखी गडद होईल. महाराष्ट्रातील सर्व मराठीप्रेमी नागरिकांसाठी ही धक्कादायक बातमी आहे . महाराष्ट्रातील मराठी भाषेला विशेष दर्जा मिळाल्याचा आनंद साजरा करत असताना, एक कठोर वास्तव देखील समोर येत आहे.

महाराष्ट्रातील सुमारे ६०० मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. शिक्षण विभागाच्या शिक्षक समायोजन प्रक्रियेमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. ही प्रक्रिया शिक्षकांची संख्या आणि विद्यार्थ्यांच्या संख्येवर आधारित आहे. १५ मार्च २०२४ च्या सरकारी निर्णयानुसार, २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी भरती जाहीर करण्यात आली होती. तथापि, अनेक शाळांमध्ये एकाही शिक्षक पदाला मान्यता मिळालेली नाही. यामुळे ग्रामीण आणि लहान शाळांना प्रभावीपणे चालणे अशक्य होत आहे. मुख्याध्यापक संघटनेने या समस्येवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे मराठी शिक्षणाचे भविष्य अडचणीत सापडले आहे.











