शिवसेना नगरसेवकाच्या हत्या प्रकरणात अरूण गवळीला जामीन मंजूर; 2007 चे हत्या प्रकरण, नेमकं काय घडलं ?

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात गुंड अरूण गवळीला 2007 मध्ये अटक करण्यात आली होती. लत्या प्रकरणात आता वयाचे कारण पुढे करत अरूण गवळीला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात गुंड अरूण गवळीला 2007 मध्ये अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अरूण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. गेल्या 17 वर्षांपासून अरूण गवळी तुरूंगात होता. तो कौटुंबिक कार्यक्रमासाठी पोलिसांच्या परवानगीने बाहेर येत असे. 90 च्या दशकात अरूण गवळी आणि गँगची मुंबई आणि परिसरात चांगलीच दहशत होती. शिवाय अनेक बेकायदेशीर धंदे यांच्यामार्फत चालवले जात असतं.

वयाचा विचार करत गवळीला जामीन

अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर गवळीला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर अपील अद्याप प्रलंबित आहे. वय आणि अपीलवरील प्रलंबित सुनावणीचा विचार करून गवळीला न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्याकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. अरुण गवळीने जन्मठेप प्रकरणी आतापर्यंत 17 वर्षे कारागृहात शिक्षा भोगली आहे. त्याचे वय सध्या 76 वर्षे असून, वयाचा विचार करुन त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

खंडणी, आर्थिक लाभ आणि मुंबई, आणि कल्याणमधील अनेक मालमत्ता हडप करण्यासाठी लोकांना धमक्या दिल्याचा अरुण गवळी आणि त्याच्या टोळीवर आरोप आहे. या प्रकरणी त्याच्या टोळीवर अनेक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 2004 साली दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरुण गवळीने शिवसेनेच्या मोहन रावले यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. तर त्यावेळचे राष्ट्रवादीचे नेते आणि अरूण गवळीचे भाचे सचिन अहिरही निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी अरूण गवळीला 92 हजार मते मिळाली होती.

नगरसेवक हत्या प्रकरण नेमकं काय?

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात गुंड अरूण गवळीला 2007 मध्ये अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अरूण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांचं त्यांच्या भागातील सदाशिव सुर्वे नावाच्या इसमासोबत प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होता. त्यानंतर सदाशिवने गवळीच्या हस्तकांमार्फत त्यांची सुपारी दिली. प्रताप गोडसेला गवळीने या सुपारीची जबाबदारी दिली होती. याप्रकरणी आपलं नाव येऊ नये यासाठी नवे शूटर्स शोधण्यास सांगण्यात आलं होतं.

गोडसेने या कामासाठी श्रीकृष्ण गुरवमार्फत नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची निवड केली. या दोघांना अडीच-अडीच लाख रुपये देण्याचं कबुल केलं आणि अॅडव्हान्स म्हणून 20-20 हजार रुपये दिले. विजयकुमार गिरीने अशोककुमार जयस्वालसोबत जवळपास 15 दिवस जामसंडेकरवर पाळत ठेवली. अखेरीस 2 मार्च 2007 रोजी संधी मिळताच जामसंडेकरच्या राहत्या घरी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. खरंतर या प्रकरणाशी अप्रत्यक्षपणे अरूण गवळीचा संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये पुढील न्यायालयीन प्रक्रियेत आणखी काही महत्वाच्या घडामोडी घडतात का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News