MP Breaking News
Sun, Dec 14, 2025

विषारी सर्पदंश करून पत्नीला संपवलं; अखेर बदलापूरमधील मास्टरमाईंड पतीच्या कृत्याचा पर्दाफाश!

Written by:Rohit Shinde
बदलापूरमधील काँग्रेसच्या महिला नेत्या नीरजा आंबेकर यांच्या मृत्यूबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनं पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.
विषारी सर्पदंश करून पत्नीला संपवलं; अखेर बदलापूरमधील मास्टरमाईंड पतीच्या कृत्याचा पर्दाफाश!

बदलापूर शहरात ब्रेन हॅमरेजमुळे ३ वर्षांपूर्वी मृत्यू झाल्याची नोंद असलेल्या एका महिलेच्या मृत्यूप्रकरणाचे गूढ अखेर उकलले आहे. तिच्या पतीनेच आपल्या तीन मित्रांच्या मदतीने विषारी सर्पदंश देऊन तिला ठार मारल्याचे भीषण कृत्य समोर आले आहे. याप्रकरणी बदलापूर पोलिसांनी तपास करून मुख्य आरोपी पतीसह सर्पमित्राला आणि अन्य दोघांना अटक केली आहे.

महिलेच्या हत्येवेळी नेमकं काय घडलं?

नीरजा आंबेरकर यांचा मृत्यू नैसर्गिक का दाखवला गेला. पती रुपेश आंबेकर याने नीरजा यांची हत्या त्याच्या तीन साथीदारांच्या मदतीने केली होती. 2022 मध्ये रुपेश आंबेरकर, चेतन दुधाने, कुणाल चौधरी आणि ऋषिकेशला घेऊन घरी गेला होता. त्याआधी त्याने घराच्या किचनमध्ये गोणीत साप आणून ठेवला होता. पत्नीच्या पायाची मालिश करण्याच्या बहाण्याने नीरजा यांना हॉलमध्ये झोपविले होते. त्यांच्यापैकी एकाने नीरजा यांच्या पायाला मालिश करण्यास सुरुवात केली. चेतन हा सर्पमित्र असल्यानं किचनमध्ये गोणीत ठेवलेला साप काढून ऋषिकेश चाळके याच्या हातात दिला’.

त्यानंतर ऋषिकेश चाळके याने हॉलमध्ये झोपलेल्या आणि नीरजा यांच्या पाठीवर रुपेश आंबेकर बसलेला असताना नीरजा यांच्या डाव्या घोट्याजवळ तीन वेळा सर्पदंश करुन जीवे ठार मारलं होतं. याचा उलगडा झाल्यानंतर नीरजा यांच्या हत्येच्या बातमीला वाचा फुटली आहे. याप्रकरणी आरोपी कुणाल चौधरी, रुपेश आंबेकर, चेतन दुधाने आणि ऋषिकेश चाळके यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात नीरजा यांच्या मृत्यूचे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांची देखील चौकशी केली जाणार आहे’, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

पती रूपेश आंबेरकर पोलिसांच्या अटकेत

ऋषिकेश चाळकेच्या जबाबाच्या आधारे बदलापूर पोलिसांनी तातडीने तपासाची गती वाढवली. अनेक महिन्यांपूर्वी बंद झालेले हे प्रकरण पुन्हा उघडण्यात आले. त्यांनी ठोस पुराव्यांच्या आधारे रूपेश आंबेरकरसह तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. सध्या पोलीस रूपेश आंबेरकरने आपल्या पत्नीची हत्या करण्याचे हे क्रूर पाऊल नेमके कोणत्या कारणांमुळे उचलले याचा तपास करत आहेत. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याबद्दलही पोलीस कसून तपास करत आहेत. तीन वर्षांपूर्वीच्या या गुन्ह्याची उकल झाल्याने बदलापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.