लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शिंदे सरकारने सुरू केलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे एकूण दहा हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता अकरावा हप्ता कधी जमा होणार? मे महिन्याचे पैसे कधी मिळणार? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
पैसे नेमके कधी येतील?
मे महिन्याचा हप्ता मे महिन्यातच जमा होण्याची शक्यता आहे. पुढील पंधरा दिवसांत लाडक्या बहिणींना मे महिन्याचा लाभ मिळू शकतो. म्हणजेच, अकराव्या हप्त्याची रक्कम मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील काही महिन्यांपासून या योजनेचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांत जमा होत आहे. त्यामुळे या महिन्यातही त्याच वेळेत पैसे जमा होऊ शकतात. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा लवकरच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे करतील, असा दावा केला जात आहे. परंतु अजून काही दिवस तुम्हाला प्रतिक्षा करावी लागणार हे नक्की.

लाडकी बहीण योजना (मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना) ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे, ज्याद्वारे महिलांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना दर महिन्याला ₹1,500 थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून हप्त्याची रक्कम जमा होण्यात विलंब होताना दिसत आहे. निधीची कमतरता हे त्यासाठीच कारण सांगितलं जात आहे.
2,100 रूपयांचं काय झालं?
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ₹1,500 आर्थिक मदत दिली जाते. मात्र, निवडणुकीच्या वेळी ₹2,100 देण्याचे आश्वासन दिले गेले होते. परंतु, अर्थसंकल्पात या वाढीव रकमेची तरतूद न केल्यामुळे महिलांना ₹1,500च मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात स्पष्ट केले की, ₹2,100 देण्याबाबतची घोषणा लवकरच केली जाईल. विरोधकांकडून या मुद्द्यावर सरकारला सातत्याने घेरलं जात आहे.