काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा हिटमॅन रोहित शर्माचे कर्णधारपद अचानक पणे काढून बीसीसीआयने नवख्या शुभमन गिलकडे टीम इंडियाच्या एकदिवसीय संघाचे कर्णधार पद सोपवले. ज्या रोहित शर्माने मागील अनेक वर्षापासून टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा अगदी यशस्वीपणे सांभाळली होती, ज्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघाने 2024 ची टी ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. त्याच रोहितला असं अचानकपणे कॅप्टनशीप वरून का काढण्यात आलं यावरही देशात बऱ्याच चर्चा झाल्या… आता मात्र रोहित शर्माच्या कर्णधारपदा बाबत नवीन खुलासा समोर आला आहे.
माजी निवडकर्त्यांच्या या खुलाशामुळे खळबळ
माजी भारतीय निवडकर्ता सलील अंकोलाने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की बीसीसीआयने २०२३ मध्ये रोहित शर्मानंतर पुढील कर्णधार म्हणून शुभमन गिलला मान्यता दिली होती. गिलच्या त्या वर्षीच्या सातत्यपूर्ण कामगिरीमध्ये बीसीसीआयने त्याला कर्णधार करण्याचे ठरवले होते. अंकोलाने विकी लालवाणीच्या यूट्यूब चॅनलवर म्हटले आहे की, “२०२३ पासून गिल कर्णधार होईल यावर आधीच एकमत झाले होते. योग्य वेळ आल्यावर तो जबाबदारी स्वीकारेल असे आम्ही आधीच ठरवले होते.

शुभमन गिलची कर्णधार म्हणून निवड करताना “निवडकर्त्यांनी केवळ प्रशिक्षक आणि कर्णधाराचेच ऐकले नाही तर वरिष्ठ खेळाडू आणि निवृत्त खेळाडूंचे मत देखील घेतले. सर्वांनी एकमताने म्हटले की रोहित शर्मा नंतर शुभमन गिल हाच टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी योग्य खेळाडू आहे.
एकाच कर्णधाराच्या जुन्या परंपरेचे पुनरागमन
भारतीय क्रिकेटमध्ये बहुतेक काळ एकच कर्णधार असण्याची परंपरा राहिली आहे. विराट कोहलीनंतर जेव्हा रोहित शर्माने तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद स्वीकारले तेव्हा तो आधीच ३० वर्षांचा होता, त्यामुळे सर्वांना माहित होते की त्याचा कार्यकाळ जास्त काळ टिकणार नाही. परंतु शुभमन गिल फक्त २६ वर्षांचा आहे. इतक्या लहान वयात त्याचा परिपक्व खेळ आणि नेतृत्व कौशल्य पाहून, बीसीसीआयने ठरवले की तो दीर्घकाळ संघाचे नेतृत्व करेल.











