गुरुवारी राज्यातील ॲप-आधारित कॅब, टॅक्सी आणि रिक्षा बंद राहणार आहेत. कॅब चालकांनी त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ 9 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. भारतीय गिग कामगार मंचने पुकारलेल्या या एकदिवसीय बंदामुळे राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. ॲप कंपन्यांनी चांगले वेतन, विमा लाभ द्यावेत आणि भाड्याची संरचना पारदर्शक ठेवावी. तसेच कंपन्यांकडून चालकांची खाती मनमानीपणे निलंबित करण्याचे प्रकार थांबवले जावेत, या मागण्यांसाठी भारतीय गिग कामगार मंचकडून बंदची हाक देण्यात आली आहे.
गिग कामगारांच्या मागण्या काय?
ॲप-आधारित वाहतूक सेवा पुरवणाऱ्या कंपन्या राज्य परिवहन विभागाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करत असल्याचा चालकांचा आरोप आहे. इंधन आणि देखभाल खर्चात प्रचंड वाढ झाली असतानाही चालकांचे उत्पन्न कमी झाले आहे. अशा परिस्थितीत चालकांना सामाजिक सुरक्षा मिळत नाहीये, तसेच तक्रारी सोडवण्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था नाही. त्यामुळे ॲप कंपन्यांनी चांगले वेतन, विमा लाभ द्यावेत आणि भाड्याची संरचना पारदर्शक ठेवावी. तसेच कंपन्यांकडून चालकांची खाती मनमानीपणे निलंबित करण्याचे प्रकार थांबवले जावेत, या मागण्या भारतीय गिग कामगार मंचकडून करण्यात आल्या आहेत.
कंपन्यांचा मनमाी कारभार सुरू?
परिवहन आयुक्त कार्यालयाने ओला, उबर आणि रॅपिडो या तिन्ही कंपन्यांना ॲपवर शासनाचे दर दाखवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, या कंपन्यांनी अद्यापही सरकारी दर लागू केलेले नाहीत. या कंपन्या सरकारी नियम पायदळी तुडवून राज्यात बेकायदेशीरपणे काम करत आहेत. अनेक गुन्हे दाखल होऊनही खासगी दुचाकीवरून प्रवासी सेवा अजूनही सुरू आहे, असे संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले. यापूर्वी 15 जुलै 2025 रोजी याच गैरकारभाराविरोधात कॅब, रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी आझाद मैदानात उपोषण आणि निदर्शने केली होती. परंतु ठोस उपाययोजना झालेली नाही.
प-आधारित टॅक्सी सेवा अचानक बंद झाल्यास नागरिकांची प्रचंड गैरसोय होण्याची शक्यता आहे. या बंदमुळे सार्वजनिक वाहतूक सेवा आणि पर्यायी वाहनांवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.





