नाशिक- कांद्यानं पुन्हा एकदा बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणणं सुरु केलेलं आहे. नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याचे दर थेट 900 ते 1000 रुपयापर्यंत कोसळलेत. ढगाळ वातावरण आणि सततच्या पावसामुळं अवघ्या दोन महिन्यातच कांदा खराब होऊ लागलाय. तर उरलेल्या कांद्याला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झालाय
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कांद्याच्या दरात सातत्यान होत असलेल्या घसरणीमुळे शेतकरी आधीच चिंतेत असताना, आता भाव घसरल्यानंतर करायचं तरी काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय.
काय आहेत कांद्याचे दर?
येवला बाजार समिती- प्रतिक्विंटल 900 ते 1000 रुपये दर
मनमाड बाजार समिती – प्रतिक्विंटल 1200
लासलगाव बाजार समिती – प्रतिक्विंटल 1350
बांगलादेश, कर्नाटकच्या कांद्याचा फटका
एकीकडे बांगलादेशात यंदा कांद्याचे बंपर उत्पादन झाल्याच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश सरकारने कांदा आयातीवर शुल्क लावले. आता कर्नाटक राज्यात नवीन कांद्याची आवक सुरू होऊन आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ या दक्षिणेकडील राज्यांतही स्थानिक आवक वाढली. परिणामी, लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्यामुळे कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे.
उत्पादन खर्चही निघेना
बाजारात कांद्याला 1500 रुपयेच्या आत प्रति क्विंटल सरासरी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडलंय
कांद्याचे सरासरी भाव
22 जुलै- प्रतिक्विंटल 1, 451 रुपये
24 जुलै- प्रतिक्विंटल 1, 425 रुपये
25 जुलै- प्रतिक्विंटल 1, 375 रुपये
26 जुलै- प्रतिक्विंटल 1, 350 रुपये
सध्या लासलगाव बाजार समितीत सरासरी 1300 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय मात्र या दरातून उत्पादन खर्चही भरून निघणार नाहीये.
सरकारनं मदत करावी, शेतकऱ्यांची भूमिका
अशा स्थितीत सरकारनं मदत करावी किंवा कांद्याला प्रतिक्विंटल प्रतिक्विंटल किमान प्रतिक्विंटल 3 हजार दर द्यावा अशी मागणी आता शेतकरी करतायेत. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात छगन भुजबळांनी कांदा दराचा मु्द्दा उपस्थित करत 2 हजार 250 रुपये हमीभाव जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली होती तर कांदाप्रश्नी एक प्लान घेऊन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं होतं. मात्र याबाबत पुढे काहीही हालचाल झाल्याचं दिसत नाहीय. आता भाव घसरल्यानं पुन्हा एकदा हा मुद्दा राजकीयदृष्ट्या तापण्याची चिन्हं आहेत.





