राज्याच्या हवामानात मोठा बदल दिसून येत आहे. गुजरातपासून पश्चिम बंगालच्या खाडीपर्यंत कमी दाबाचा पट्टा म्हणजेच ट्रफ लाईन तयार झाल्याने विदर्भात पुढील तीन दिवस अतिवृष्टी ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर कोकणासह महाराष्ट्राच्या उर्वरीत भागात मात्र पाऊस काहीशी विश्रांती घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पावसाबाबत वर्तविलेला अंदाज सविस्तर जाणून घेऊ…
विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता
गुजरातपासून पश्चिम बंगालच्या खाडीपर्यंत कमी दाबाचा पट्टा म्हणजेच ट्रफ लाईन तयार झाल्याने विदर्भात पुढील तीन दिवस अतिवृष्टी ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भात पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांत पुढील दोन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने जाहीर केला आहे. काही भागांत गडगडाटासह जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अखंड पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्याच्या उर्वरीत भागात तुरळक पाऊस
दरम्यान, राज्याच्या इतर काही भागांत स्थानिक वातावरण निर्माण होऊन तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. औरंगाबाद, जालना, बीड व परभणी जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. तर पुणे, नाशिक आणि सातारा जिल्ह्यांत ढगाळ हवामान राहून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतील. नागरिकांना या काळात विशेष सतर्कता बाळगावी लागेल.
कोकण किनाऱ्यावर पुढील काही दिवस पावसाची तीव्रता कमी होणार आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. या भागांत ढगाळ वातावरण टिकून राहील, अशी शक्यता आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला कोकणात पावसाने दमदार उपस्थिती दर्शवली असून यंदा सरासरीपेक्षा 100 टक्क्यांहून अधिक पाऊस नोंदवला गेला आहे.





