MP Breaking News
Sun, Dec 14, 2025

मुंब्रा लोकल अपघातानंतर ठाण्यात मनसेचं आंदोलन, अविनाश जाधवांच्या नेतृत्वात धडक मोर्चा

Written by:Rohit Shinde
मुंब्रा रेल्वे दुर्घटनेप्रकरणी मनसे आक्रमक झाली आहे. मुंब्रा स्थानकावर अविनाश जाधवांच्या नेतृत्वात धडक मोर्चा काढण्यात आला....पोलिसांनी हस्तक्षेप करावा लागला.
मुंब्रा लोकल अपघातानंतर ठाण्यात मनसेचं आंदोलन, अविनाश जाधवांच्या नेतृत्वात धडक मोर्चा

ठाणे: मुंब्रा रेल्वे दुर्घटनेप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) धडक मोर्चा काढण्यात आला. गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत मनसेचा मोर्चा सुरू होता. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला. या मोर्चात मनसेच्या अविनाश जाधवांसह ठाणेकर आणि रेल्वे प्रवासीसुद्धा सहभागी झाले.

मनसेची आक्रमक भूमिका

मुंबई लोकलमधील प्रवाशांची संख्या आणि त्या प्रमाणात गाड्यांमधील आसन क्षमतेची उपलब्धी आहे का? याचा तक्ता सादर करा. दिवा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी लोकल सेवा चालू करण्यात येणाऱ्या अडचणींची लेखी माहिती द्या. रेल्वे अपघात नुकसान भरपाई रक्कम ही अत्यंत तुटपुंजी आहे. ती वाढवून 25 लाख रुपये करावी. उशिरा मिळालेला न्याय हा न्याय असूच शकत नाही. त्यामुळे अपघातांच्या केसेस अनेक वर्षे प्रलंबित ठेवण्याचं प्रयोजन काय?गेल्या 15 वर्षात 45 हजार प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला. त्यापैकी नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भातील आठ हजार केसेस अद्यापही प्रलंबित आहेत. त्याची कारणे लेखी द्या. एका डब्यामध्ये किती प्रवाशांनी प्रवास करणं रेल्वे प्रशासनाला अपेक्षित आहे. याची नियमावली सादर करा. मुंबई लोकल सेवेतून मिळणारं मासिक उत्पन्न तथा मासिक खर्च याची माहिती द्या.

अशा मनसेच्या काही प्रमुख मागण्या आहेत.

अपघातावेळी नेमकं काय घडलं?

मुंब्रा दुर्घटनेने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईकरांची जणू जीवनवाहिनी असलेल्या लोकल अपघातात काल चार जणांचा जीव गेला. या अपघातात 13 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्यातील चाौघांवर शस्त्रक्रिया होणार आहे. दरम्यान या अपघातातील चार जणांचा मृत्यू टाळता आला असता असे प्रवाशांचे म्हणणे आहे. ही दुर्घटना टळली असती असा नवीन दावा समोर येत आहे. एका हलगर्जीपणामुळे प्रवाशांचा नाहक जीव गेल्याचा दावा करण्यात येत आहे.