MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

मेट्रो स्टेशनवर पाणी गळतीच्या घटनेनंतर सरकार सतर्क; पावसाळी आपत्कालीन प्लान तयार करा, आशिष शेलारांचे आदेश

Written by:Smita Gangurde
मुंबईत झालेल्या पहिल्याच पावसात मेट्रो स्टेशनवर झालेल्या गळतीमुळे एमएमआरडीएच्या कामावर सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. याशिवाय प्रवाशांमध्येही काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मुंबई – मान्सूनच्या पहिल्याच पावसात मुंबईतील मेट्रो ३ च्या अॅक्वा लाईनवरील अचार्य अत्रे चौक मेट्रो रेल्वे स्टेशनवरच्या पाणी गळतीची चर्चा झाली. भुयारी मेट्रो स्टेशन असलेल्या या स्टेशनमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती झाल्याचं पाहायला मिळालं. संरक्षक भिंतीचं काम झालं नाही असं कारण मेट्रो व्यवस्थापन आणि सरकारच्या वतीनं देण्यात आलं असलं तरी यामुळे भुयारी मेट्रोच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले.

अखेर काही दिवस हे मेट्रो स्टेशन बंद करुन दुरुस्तीच्या कामानंतर हे आचार्य अत्रे मेट्रो स्टेशन पुन्हा कार्यान्वित करण्यात आलं. मात्र या घटनेनं सरकार सतर्क झालं असून, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार गेल्या दोन तीन दिवसांपासून मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेताना दिसतायेत. याचाच एक भाग म्हणून एमएमआरडीए कार्यालयात जाऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. या उच्चस्तरीय बैठकीत गर्दीच्या मेट्रो स्टेशनचा पावसाळी आपत्कालीन प्लॅन तयार करा, असे आदेश त्यांनी यंत्रणांना दिलेत.

टीम म्हणून एकत्रित काम करा- शेलार

एमएमआरडीए, मेट्रोची सर्व प्राधिकरणे यांनी आपापसात समन्वय तर ठेवावाच सोबत मुंबई महापालिकेशीही सतत संपर्क आणि समन्वय ठेवा, कुणीही कुठल्याही परिस्थितीत दोषारोप न करता एक टीम म्हणून सगळ्यांनी एकत्रितपणे कामे करा, असे स्पष्ट निर्देश यावेळी आशिष शेलार यांनी दिलेत. या बैठकीला एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार, अश्विन मुदगल, आस्तिककुमार पांडे, महा मेट्रोच्या संचालिका रुबल अग्रवाल, यांच्या सह मुंबई महापालिका आणि संबंधित प्राधिकरणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मेट्रोची स्वतंत्र कंट्रोल रुम

या बैठकीत पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामांचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यामध्ये एमएमआरडीए आणि महामेट्रो या दोन्ही प्राधिकरणांकडून स्वतंत्र आपत्कालीन कंट्रोल रुम तयार करण्यात आली आहे. याची माहिती देण्यात आली. आपत्कालीन मदत सेवेसाठी 24×7 सेवा देण्यासाठी टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवणारी यंत्रणा प्रत्येक प्रकल्पासाठी उभारण्यात आली आहे.

मेट्रोच्या कामांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश

ज्या ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत त्यांची सुरक्षा तपासणी करा, भूमिगत मेट्रोमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करुन द्या, असे आदेश यावेळी मंत्री शेलार यांनी दिलेत. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली किंवा गाड्यांची गती कमी झाली तर अंधेरी, घाटकोपर सारख्या जास्त गर्दीच्या मेट्रो स्टेशनवरुन प्रवाशांना बाहेर काढणे, तसेच अन्य वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे याबाबत एक आपत्कालीन आराखडा तयार करा, ज्यामध्ये मुंबई महापालिका आणि बेस्ट यांना समाविष्ट करुन घ्या, असे निर्देशही मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.