State Government : मे महिन्याच्या अंतिम आठवड्यात पावसाने मुंबईची तुंबई केली. त्यामुळं आता राज्य सरकार पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सक्रीय झाले आहे. सर्व नदी किनारी पूर नियंत्रणाच्या उपाययोजना करुन पूर रेषेबाबतची मार्गदर्शक तत्वे पुन्हा निश्चित करावीत. राज्यात अनेक नद्यांच्या किनारी भागात अनेक वर्षांमध्ये पूर परिस्थिती उद्भवल्याची नोंद नाही. त्यामुळं पूर नियंत्रण रेषेमुळे विकासाला मर्यादा येत आहेत. म्हणून पूर रेषेबाबतची मार्गदर्शक तत्वे पुन्हा निश्चित करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
बदलापूर शहरातील विविध कामांचा आढावा…
दरम्यान, बदलापूर शहरात स्वतंत्र वीज उपकेंद्र असणे आवश्यक असल्याने प्रस्तावित टाटा पॉवर कंपनीच्या उपकेंद्रास लागणाऱ्या जागेला एमएमआरडीएने तातडीने मान्यता द्यावी. कुळगाव मधील खासगी मिळकतीवरील शाळेच्या अनधिकृत बांधकामाबाबत आरक्षणात बदल करून ती शाळा नगरपरिषदेने चालवण्यास घ्यावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच कुळगाव पोलीस स्टेशनसाठी ‘एमआयडीसी’च्या जागेबाबत तातडीने प्रस्ताव सादर करून गृह विभागाने त्यास मंजूरी देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यासहकुळगाव बदलापूर परिसरात सुरू असलेल्या विविध स्थानिक प्रकल्पांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला.
पूर रेषेबाबत नव्याने सर्वेक्षण व्हावे…
कुळगाव बदलापूर हद्दीतील बेलवली कात्रप रेल्वे क्रॉसिंग ओव्हरब्रिजबाबत ‘एमएमआरडीए’ने तर दत्त चौक ते समर्थनगर पर्यंतच्या रेल्वे लाईनला समांतर ओव्हर ब्रिज बांधण्याच्या कामाबाबत नगर परिषदेने तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी. उल्हास नदीकिनारी नकाशातील पूर रेषा आणि प्रत्यक्ष परिस्थिती याबाबत माहिती घेतली. यानंतर जेथे अनेक वर्षे पूर आलेला नाही त्याठिकाणी जलसंपदा विभागाने पूर रेषेबाबत नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी दिले. या कामाबरोबरच बदलापूर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी सॅटिस प्रकल्पाच्या कामास गती द्यावी. असे मुख्यमंत्री म्हणाले.





