State Government : महाराष्ट्राचा विकास झपाट्याने होत असून शक्तीपीठ समृद्ध महामार्गाने महामार्गाचे जाळे विस्तारले जातंय. महाराष्ट्राच्या प्रगतीत शेतकऱ्यांचा मोठा वाटा असून, शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीजपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत जगातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्यूटेड सोलरचा प्रकल्प महाराष्ट्रात सुरु आहे. शेतकऱ्यांना १२ तास दिवसाची वीज मिळेल. त्यावेळी १०० टक्के हरित वीज देणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल. असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
प्रत्येक गावात सिमेंट क्राॅक्रीटचा रस्ता…
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज, संतांच्या मांदियाळींनी दाखवलेल्या मार्गाने आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या अनुरूप आपला महाराष्ट्र यापुढेही चालत राहील, अशा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. १ हजार लोकसंख्येंपर्यंतच्या प्रत्येक गावांमध्ये काँक्रीटचा रस्ता नेण्याचा देखील निर्णय घेतला आहे. आमचा विश्वास आहे की, भारताच्या विकासाच्या गाथेत महाराष्ट्र हा सर्वात मोठा सहभागी असणार आहे. त्या दृष्टीने येत्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून या ठिकाणी काम करायचे आहे.
४० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रातून…
एकीकडे उत्तम अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था आणि शिक्षणाच्या व्यवस्थेसोबत मानव संसाधन विकसित करण्याकरता महाराष्ट्राने प्रयत्न सुरू केले आहेत. कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधनाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र हा देशाच्या संपूर्ण विकास व्यवस्थेत योगदान देईल. जगातील ११ व्या अर्थव्यवस्थेवरुन ४ थ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यत महाराष्ट्राने मजल मारली आहे. भारतामध्ये थेट परदेशी गुंतवणूक येते, त्यापैकी ४० टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रामध्ये आली आहे. या गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती राज्यामध्ये होत आहे.
गडचिरोलीत नवीन स्टील हब…
गडचिरोली हे आता देशाचे नवीन स्टील हब म्हणून तयार होत आहे. पुढच्या दहा वर्षांमध्ये देशातली सगळ्यात मोठी स्टीलची कॅपॅसिटी तयार होणार आहे. महाराष्ट्रामध्ये सुरक्षा दलांनी, पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य निर्माण केलेले आहे. गडचिरोलीमध्ये काम करणाऱ्या पोलिसांनी जवळपास आता गडचिरोलीला नक्षल मुक्त, माओवादी मुक्त केले आहे.
पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर…
महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. रस्ते, विमानतळ सोबत वाढवण बंदरचे काम हाती घेतले आहे. हे बंदर जगातलं दहाव्या क्रमांकाच्या पहिल्या दहा बंदरामध्ये आहे. यामुळे महाराष्ट्र आणि भारत एक नवीन मेरिटाइम पॉवर होणार आहे. सिंचनाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. विशेषतः नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून वैनगंगा, नळगंगा योजना असेल, किंवा समुद्रात वाहून जाणारे पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणे, विविध नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून तापीच्या खोऱ्यामध्ये पाणी आणणे.





