देशभरात यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे दर्जेदार सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. परिणामी अशा सोयाबीनला बाजारात प्रचंड मागणी असून, दरही झपाट्याने वाढले आहेत. साधारण सोयाबीनचा भाव जिथे हमीभावापेक्षा हजार रुपयांनी कमी आहे, साधारण सोयाबीनल 4 ते 5 हजारांचा दर मिळताना दिसत आहे. मात्र दर्जेदार पिवळ्या सोयाबीनला प्रति क्विंटल ६ हजारांपर्यंत दर मिळत आहे. खरेदी सुरू असून, व्यापाऱ्यांच्या मते, या मागणीचा फायदा काही शेतकऱ्यांना मिळत आहे.
पिवळ्या सोयाबीनला उच्चांकी दर
राज्यातील सोयाबीन बाजारात मोठा चढ-उतार पाहायला मिळाला आहे. पिवळ्या सोयाबीनला राज्यभरात सर्वाधिक मागणी दिसून आली आहे. अनेक बाजारांमध्ये दरात तेजी होती, तर काही ठिकाणी आवक कमी राहिली. सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले ते वाशीम बाजारसमितीमध्ये सोयाबीनला तब्बल 6,035 प्रति क्विंटल इतका दर मिळाला. 25 नोव्हेंबर रोजी राज्यभरात एकूण सोयाबीन आवक 71,124 क्विंटल इतकी झाली. बहुतेक बाजारात आवक मध्यम ते जास्त प्रमाणात होती. पिवळ्या सोयाबीनला व्यापाऱ्यांची विशेष पसंती मिळत असल्याने या जातीचे दर अनेक बाजारात 4,400 ते 5,100 रुपयांच्या दरम्यान स्थिर होते. तर लोकल व मिक्स सोयाबीनला तुलनेने कमी प्रतिसाद मिळाला.

अकोला, मेहकर, चिखली, उमरेड, उमरखेड, बीड, यवतमाळ या बाजारांमध्ये पिवळ्या सोयाबीनची मागणी वाढताना दिसली. व्यापाऱ्यांनी सकाळपासून विक्रमी खरेदी केली. ज्याचा भावावर सकारात्मक परिणाम दिसून आला. विशेष म्हणजे, सोलापूर, अमरावती आणि नागपूर बाजारांमध्ये लोकल सोयाबीनची आवक जास्त होती, पण भाव मात्र मध्यम पातळीवर राहिले. लातूर बाजारात सर्वाधिक म्हणजे 23,548 क्विंटल इतकी आवक झाली. कारंजा येथे 9,500 क्विंटल, तर रिसोड येथे 3,439 क्विंटल इतकी आवक नोंदली गेली. अमरावती, अकोला आणि मंगरुळपीर बाजार समितीमध्ये आवक चांगली वाढली असून या पिवळ्या सोयाबीनची खरेदी जास्त झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये फक्त 24 क्विंटल इतकी आवक झाली. राहूरी-वांबोरी येथे 11 क्विंटल, पैठणमध्ये 19 क्विंटल तर गंगापूरमध्ये तर केवळ 2 क्विंटल सोयाबीन आले. तुळजापूरमध्येही आवक फक्त 125 क्विंटल नोंदली गेली. कमी आवक असूनही काही बाजारात दर 4,500 रुपयांच्या आसपास स्थिर राहिले.
सोयाबीनची प्रत घसरली; दर घटले
यंदाच्या महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन पिकावर या नैसर्गिक आपत्तीचा मोठा परिणाम झाला आहे. सततच्या पावसामुळे पिके पाण्याखाली गेली, मुळे कुजली आणि उत्पादन क्षमता घटली. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने घेतलेले सोयाबीन पीक आता नष्ट झाल्याने त्यांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे. बाजारात सोयाबीनच्या दरातही घट झाल्याने नुकसान भरून काढणे अशक्य बनले आहे.
प्रत चांगली न राहिल्याने बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सध्या चांगला दर मिळताना दिसत नाही. बाजारात सोयाबीनच्या दरातही घट झाल्याने नुकसान भरून काढणे अशक्य बनले आहे. सरकारकडून मदतीच्या घोषणा झाल्या असल्या तरी अनेक शेतकऱ्यांपर्यंत त्या पोहोचलेल्या नाहीत. अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्यांची कर्जबाजारीपणाची समस्या अधिक तीव्र झाली आहे. एकूणच, यंदाची अतिवृष्टी आणि पूरस्थितीने महाराष्ट्रातील शेती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, पीकविमा दावे आणि पुनर्वसनाची गरज आहे. अन्यथा ग्रामीण अर्थव्यवस्था आणखी ढासळण्याचा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे पिवळ्या सोयाबीनला चांगला दर मिळत असला साधारण सोयाबीनच्या वाणाला 5 हजारांच्या आतील दर मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.











