BJP Vs Sanjay Raut – आमच्या काळात मुंबई पालिकेत 90 हजार कोटीच्या ठेवी ठेवल्या होत्या, पण त्याची लूट तुमच्या सरकारने केली आहे. मुंबई, ठाण्याला लुटणारे सरकारमध्येच आहेत. सरकारमधील लोकांनी भ्रष्टाचार केला आहे. तरीसुद्धा ते आज सरकारमध्ये आहेत. अशी टिका राऊतांनी भाजपावर केली होती. पण पालिका निवडणुकीत आम्ही भ्रष्टाचाराची हंडी फोडणार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणत शिवसेना (ठाकरे) गटावर टिका केली आहे. यावर भाजपा व संजय राऊत यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.
खरा महाजोकर तुम्ही व तुमचा गटच…
दरम्यान, मृतावरच्या टाळुवरील लोणी खाणारे जर कोणी असतील तर ते स्वतः संजय राऊत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासाचे थर लावत आहेत. व भ्रष्टाचाराची हंडी फोडताहेत. त्यामुळेच तुम्हाला त्याची झळ बसत आहे. मातोश्री-२ कुणाच्या कमिशनवर उभी राहिली, याचं उत्तर आधी द्या. उद्धव ठाकरे हे लुटारूंचे सरदार आहेत, त्यामुळे संजय राऊतांनी कमिशनच्या बाता मारू नयेत. पालिका निवडणुकीत खरा महाजोकर तुम्ही व तुमचा गटच आहे, हे मुंबईकर व मराठी माणूस दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशी टिकासं बन यांनी केली.
तुम्हांला घरी बसवलं…
दरम्यान, उबाठा गटाच्या ५२ पत्त्यांच्या गड्डीत सर्वच पत्ते जोकरचे आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी महाजोकराची भाषा करू नये. ही वस्तुस्थिती माकडछाप संजय राऊत यांनी ध्यानात घ्यावी, अशी टिका भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर केली आहे. भाजपाने राऊतांच्या टिकेला उत्तर दिलं आहे, तुमचे मालक उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीवेळी म्हणाले होते ‘एकतर तू राहशील किंवा मी राहीन’. मात्र जनतेने उद्धव ठाकरेंना महाजोकर करून घरी बसवले. आणि देवेंद्र फडणवीस जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले. असं भाजपाने म्हटले आहे .
तुम्हाला शिमगा करायला भाग पाडले…
महाराष्ट्रात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला शिमगा करायला भाग पाडले. तुमचा पराभव झाला म्हणून तुम्हांला दोन्ही हातांनी बोंबा माराव्या लागल्या. आणि जनतेनं तुम्हाला घरी बसवले. आता २०२९ ची वाट पाहू नका, येणाऱ्या पालिका निवडणुकीतच मुंबईकर तुमच्या बडबडीला कंटाळून तुमच्या तोंडाला बूच लावतील. अशी टिका नवनाथ बन यांनी राऊतांच्या २०२९ च्या कोकणातील भविष्यवाणीवरुन केली. तसेच नारायण राणे त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरताना राऊतांना थोडी लाज वाटली पाहिजे. अशी टिका बन यांनी राऊतांवर केलीय.





