मुंबई- सोशल मीडियावर ट्रेडिंग गुरु अशी ओळख असलेले अवधूत साठे अडचणीत सापडले आहेत.
नियमबाह्य सल्ले देऊन शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांना गंडवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याच प्रकरणात सेबीनं त्यांच्या कार्यालयावर छापा मारलाय. कर्जतच्या त्यांच्या ट्रेडिंग अकॅडमीमध्ये सुद्धा दोन दिवस शोध मोहीम सुरु आहे…
मुंबईच्या मुलुंडमधल्या अवधूत साठेंच्या ऑफिसमध्ये सेबीने छापा मारला, त्यानंर साठे चर्चेत आलेत.

कोण आहेत अवधूत साठे?
1. अवधूत साठे फायनान्शियल इन्फ्लूएन्सर आणि ट्रेडिंग गुरू
2. कर्जतमधील सुप्रसिद्ध बाजार तज्ञ, शिक्षक आणि ट्रेडिंग एक्सपर्ट
3. साठे यांच्या यूट्यूब चॅनेलवर सब्सक्राइबर्सची संख्या 9,36,000
4. बाजार विश्लेषण, चार्ट पॅटर्न आणि गुंतवणूक धोरणांची माहिती देण्याचं काम साठे करतात
5. 2021 मध्ये साठेंची मालमत्ता 17 कोटी, 2023 मध्ये 86 कोटींवर पोहोचली
साठेंवर का झाली सेबीची छापेमारी?
अवधूत साठे यांनी सेबीमध्ये नोंदणी न करता गुंतवणूक सल्लागार म्हणून काम केलं, हा त्यांच्यावर मुख्य आरोप आहे. गुंतवणूक सल्ल्यातून 400 ते 500 कोटींचा व्यवहार झाल्याचा सेबीचा अंदाज आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात नियमबाह्य पद्धतीने सल्ले दिल्याचा संशय व्यक्त होतोय. लाईव्ह मार्केट डेटा वापरल्याचा आरोप आहे.
किरकोळ गुंतवणूकदारांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. गुंतवणूकदारांना ‘गॅरंटीड रिटर्न’ म्हणजेच निश्चित परताव्याचं आश्वासन दिलं. शेअर बाजारात असं आश्वासन देणं नियमबाह्य मानलं जातं.
इतर इन्फ्युअन्सर्सना इशारा
अवधूत साठे यांच्यावर झालेली ही कारवाई, हा सेबीच्या मोहिमेचा भाग आहे. सेबीनं दिशाभूल करणाऱ्या फायनान्शियल इन्फ्ल्युअन्सर्सना टार्गेट केलंय. आता साठेंनंतर मुंबई आणि पुण्यासह इतरही शहरात आणखी कोणावर कारवाई होते, हे पाहावं लागणार आहे.
गुंतवणूकदार धडा घेणार का?
गेल्या काही काळापासून त्यातही कोविड काळानंतर यूट्यबवरुन आणि इतर माध्यमातून शेअर बाजारात कशी गुंतवणूक करावी, याचा सल्ला देणाऱ्या तज्ज्ञांचं मोठं पेव देशात आलेलं आहे. अनेक जणं शेअर बाजारात गुंतवणूक करुन पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात असताना ही इंडस्टी मोठी झालेली आहे. हे स्वयंघोषित तज्ज्ञ कार्यशाळा किंवा इतर माध्यमातून बाजारातील गुंतवणुकीचे धडे देतात. त्यासाठी काही पैसेही उकळण्यात येत असल्याचं सांगण्यात येतं. या टिप्सच्या नादात या तज्ज्ञांकडे आणि बाजारात अनेकांनी केलेल्या गुंतवणुकी अडचणीत आल्याचीही उदाहरणे आहेत. आता साठेंवरील कारवाईनंतर अशा मंडळींवर विश्वास ठेवणारे गुंतवणूकदार धडा घेणार का हाही प्रश्न आहे.











