उत्तरकाशी- उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात मंगळवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास झालेल्या ढगफुटीनं संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालंय. गंगोत्रीच्या डोंगरातून वाहणाऱ्या खीर नदीला अचानक मोठा पूर आला.
पाण्याच्या वेग इतका भयंकर होता की अवघ्या 34 सेकंदात धराली गावातील घरं आणि हॉटेलं जमीनदोस्त झाली. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून 50 पेक्षा जास्त जण बेपत्ता झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीतीही वर्तवण्यात येतेय. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु आहे. आत्तापर्यंत 20 हून अधिक जणांना वाचवण्यात यश आल्याचं सांगण्यात येतंय.
Nature’s Fury at its worst. Horrifying footage of the moment.
A #Cloudburst led to #flashfloods and #Landslide in the High Altitude village in #Dharali, #Uttarkashi in #Uttarakhand
People seen running away but are swept away in seconds
Several houses… pic.twitter.com/DPG9JDr3yF
— Surya Reddy (@jsuryareddy) August 5, 2025
30 फुटांपर्यंत राडारोडा जमा
या दुर्घटनेचे अनेक व्हिडीओ आता समोर येत आहेत. यात अचानक झालेल्या ढगफुटीनं आणि आलेल्या पुरानंतर नागरिक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळताना दिसतायेत. चारही बाजूंना आक्रोश सुरु असल्याचंही या व्हिडीओतून दिसतंय.
जे नागरिक या दुर्घटनेचे व्हिडीओ चित्रीत करत होते, ते दूर अंतरावर असले तरीही ओरडून जीव वाचवण्याचं आवाहन सगळ्यांना करत असल्याचं दिसतंय. या दुर्घटनेनंतर धराली गावात 30 फूट उंचीचा राडारोडा जमा झाला आहे. यावकरुन ही दुर्घटना किती भयंकर होती, याचा अंदाज बांधता येईल. गावातील बाजारातील सर्व दुकानं आणि धरं दुर्घटनेत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
नेमकी कुठे घडली दुर्घटना?
धराली हे गंगोत्री धामपासून 10 किमी अंतारवर असलेलं गाव आहे. उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात डोंगराळ भागात धराली गाव येतं. भागिरथी नदीच्या किनारी, हर्षिल घाटात हे गाव वसलेलं आहे.
गंगोत्री यात्रेसाठी जाणाऱ्या पर्यटकांचा धराली हा प्रमुख पडाव आहे. गंगोत्री धामाला जाण्यापूर्वी हे अंतिम मोठं गाव आहे, जिथून पुढे कठीण चढाई सुरु होते. दुर्घटना घडली त्यावेळी गावात नेमके किती जण होते, याची माहिती प्रशासन अद्याप गोळा करीत आहे.
कशी होते ढगफुटी?
आकाशात तरंगणारे ढग हे पाण्याचे कण आणि बर्फ असतात. जेव्हा कोणत्याही छोट्या भागात जास्त पाऊस पडतो. त्यावेळी त्याला ढगफुटीसदृश्य पाऊस पडला असं म्हणण्यात येतं. यात वास्तवात ढगफुटी होत नसली तरी प्रचंड प्रमाणात पाऊस एका भागात पडल्यानं मोठी हानी होते. हवामान विभागाच्या अनुसार 20 ते 30 किमी परिघात एका तासात किंवा त्याहून कमी काळात 100 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला तर त्याला ढगफुटी झाली असं म्हणण्यात येतं.





