माजी पंतप्रधान एच डी देवेगौडांचा नातू प्रज्वल रेवण्णाला बलात्कार प्रकरणात जन्मठेप; विशेष न्यायालयाचा निकाल

Rohit Shinde

कर्नाटकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्नाटकच्या बंगळुरू येथील जनता दल सेक्युलर पक्षाचे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांना बंगळुरू विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. फार्म हाऊसमध्ये काम करणाऱ्या महिलेवरील बलात्कारप्रकरणी प्रज्वल रेवण्णावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून हा खटला सुरू होता. त्यानंतर आता या प्रकरणात हा मोठा निकाल समोर आला आहे.

प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा

खरंतर गेल्या वर्षभरापासून याप्रकरणी न्यायालयीन खटला सुरू होता, अखेर आज बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने प्रज्ज्वल रेवण्णा यास दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे जनता दल सेक्युलर पक्षाला हा मोठा झटका मानला जातो. दरम्यान, लोकसभा निवडणुकांपूर्वीच प्रज्वल रेवण्णा यांच्यावरील आरोपांमुळे राजकीय वर्तुळात रान उठले होते. त्यानंतर, देशभरात हे प्रकरण चर्चेत असल्याने आजच्या न्यायालयाच्या निर्णयाकडे देशाचे लक्ष लागले होते, आणि अखेर कोर्टाने या प्रकरणात निकाल दिला असून माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांना बंगळुरू विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

प्रज्वल रेवण्णावर अनेक आरोप

प्रज्वल रेवण्णा याला चार लैंगिक शोषण व बलात्कार प्रकरणांपैकी एका प्रकरणात दोषी ठरवले. विशेष न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी आज रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. रेवण्णाने त्याच्या कुटुंबाच्या फार्म हाऊसमध्ये काम करणाऱ्या एका 47 वर्षीय महिलेने मागील वर्षी एप्रिलमध्ये त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केली होता. तिने रेवण्णा यांच्यावर 2021 पासून अनेकवेळा बलात्कार केल्याचा आणि या घटनेबद्दल कोणालाही सांगितल्यास व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता रेवण्णावर बलात्कार, धमकी देणे आणि अश्लील फोटो लीक करणे अशा कलमांखाली आरोप करण्यात आले होते. गेल्या वर्षी सेक्स स्कॅण्डलमध्ये समोर आल्यानंतर रेवण्णाचे नाव चर्चेत आलं होतं. रेवण्णावर 50 हून अधिक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

प्रज्वल रेवण्णा हे राजकारणी असून ते जनता दल सेक्युलर पक्षाचे सदस्य आहेत. ते कर्नाटकातील हसन लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. प्रज्वल रेवण्णा हे माजी पंतप्रधान एच.डी. देवगौडा यांचे नातू आणि कर्नाटकाचे माजी मंत्री एच.डी. रेवण्णा यांचे पुत्र आहेत. क्षणाने ते अभियांत्रिकी पदवीधर आहेत. कर्नाटकातील राजकारणात त्यांची छाप वाढत होती. मात्र आता बलात्कार प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

ताज्या बातम्या