पाकव्याप्त काश्मिरात ऑपरेशन ‘सिंदूर’ अंतर्गत 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक; कारवाईचा व्हिडिओ समोर

Rohit Shinde

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा बदला घेतला आहे. पाकव्याप्त काश्मिरात घुसून भारतीय हवाई सेनेने एअरस्ट्राईक केला असून यामध्ये दहशतवाद्यांचे 9 तळ उध्वस्त झाल्याची माहिती आहे. ऑपरेशन ‘सिंदूर’ अंतर्गत ही मोठी कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे यामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय लष्कराने हल्ल्याची माहिती दिली आहे.

ऑपरेशन सिंदूर, पाकला दणका!

भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या हवाईक्षेत्रात घुसून नऊ अतिरेकी तळांवर “ॲापरेशन सिंदूर” अंतर्गत एअर स्ट्राईक केला आहे. या एअर स्ट्राईक मध्ये पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील बहावलपूर या अतिरेकी तळावर देखील भारतीय वायुदलाने एअर स्ट्राईक केला आहे.  याच बहावलपूर दहशतवादी तळावर भारताचा मोस्ट वॅांटेड अतिरेकी मसूद अजहर याचाही राहण्याचा पत्ता आहे, आणि याच ठिकाणी भारतीय वायुदलाने एअर स्ट्राईक केला आहे. भारतीय वायूदलाने मध्यरात्री 1.30 मिनिटांनी पाकव्याप्त काश्मीर मधील अतिरेकी तळांवर एअर स्ट्राईक केला आहे.

लष्कराकडून अधिकृत माहिती

‘काही वेळापूर्वी भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेअंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक कारवाई केली आहे. ही ठिकाणं भारतावर हल्ल्यांची आखणी आणि मार्गदर्शनासाठी वापरली जात होती.’ अशा शब्दांत भारतीय सेनेकडून माहिती देण्यात आली आहे.

‘ही कारवाई अतिशय नेमकी, मोजकी आणि अशांतता न घडवणारी होती. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलेले नाही. भारताने लक्ष्यांची निवड व कारवाईची पद्धत ठरवताना अत्यंत संयम दाखवला आहे. ही पावले पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उचलण्यात आली आहेत. या हल्ल्यात 25 भारतीय आणि एक नेपाळी नागरिक ठार झाले होते. आपण या घटनेमागे जबाबदार असणाऱ्यांना उत्तरदायी ठरवण्याच्या आपल्या वचनाशी प्रामाणिक राहतो.’

भारताच्या कारवाईला जगभरातून पाठिंबा 

विशेष म्हणजे भारताच्या या कारवाईला जगभरातून समर्थन मिळताना दिसत आहे. ‘भारत अशी कारवाई करेल, अशी आम्हाला कल्पना होती’ अशी प्रतिक्रिया या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. तसेच याआधीच रशियाने देखील भारताची बाजू घेतली होती. भारताने जगभरात दहशतवादाविरोधात मोठा लढा सुरू केला आहे. जागतिक पातळीवर अनेक देशांना यासाठी एकत्रित आणण्याचं काम गेल्या काही वर्षांत भारताने केलं आहे.

 

ताज्या बातम्या