कुलगाममध्ये सेनेचं सर्च ऑपरेशन, एका संशयित तरूणाच्या मृत्यूच गूढ वाढलं; नव्या व्हिडीओने खळबळ

Rohit Shinde

पहलगाम दहशतवादी हल्ल्याने अवघा देश हादरला होता. त्यानंतर आता त्या भागात दहशतीचे वातावरण आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांची शोध मोहिम सुरू आहे. या अभियानाअंतर्गत अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यादरम्यान काश्मीरच्या कुलगाममध्ये एका तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. रविवारी कुलगाममध्ये तंगमार्ग येथील 22 वर्षीय इम्तियाज अहमद मागरेचा मृतदेह अदबदल नाल्याजवळ सापडला. मागरेच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, दोन दिवसांपूर्वी त्याला सैन्याने ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे त्याचा मृत्यू कसा झाला याचा न्यायालयीन तपास व्हावा.

महबूबा मुफ्तींकडून न्यायालयीन तपासाची मागणी

पीडीपीच्या अध्यक्षा आणि जम्मू काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्तींनी मात्र या प्रकरणात थेट न्यायालयीन तपासाची मागणी केली आहे. त्यांनी कुलगाम आणि बांदीपूर येथे झालेल्या 2 संशयितांच्या मृत्यूवर शंका व्यक्त केली आहे. ‘बांदीपूर आणि कुलगाम घटनेवरून होणारे आरोप प्रत्यारोप चिंताजनक आहेत. या पूर्ण प्रकरणाचा कसून तपास व्हावा, जेणेकरून सत्य समोर येईल’ अशी मागणी महबूबा मुफ्तींनी केली आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांच्या माहितीनुसार, मागरे हा एक ओव्हर ग्राउंड वर्कर (OGW) होता आणि त्याने लष्कराला दहशतवाद्यांचे एक ठिकाण दाखवले होते. दुसऱ्या ठिकाणी जात असताना त्याने नाल्यात उडी मारली आणि बुडून त्याचा मृत्यू झाला, असा पोलिसांचा दावा आहे. या घटनेचा एक ड्रोन फूटेजही जारी करण्यात आला आहे. याबाबत सेनेकडूनही दुजोरा देण्यात आला आहे.

 

ताज्या बातम्या