मिस वर्ल्ड ओपल सुचाताला पाहायचंय आयोध्येचं राम मंदिर, रामायणाला थायलंडमध्ये काय म्हणतात?

भारत आणि थायलंडमधील सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध खूप जुने आहेत. थायलंडमध्ये भारताचा प्रसिद्ध ग्रंथ 'रामायण' याला 'रामकियेन' असे म्हणतात.

Miss World 2025 : मिस वर्ल्ड २०२५ चा खिताब थायलंडची ओपल सुचाता चुआंगसरी हिने जिंकला. यानंतर एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना ओपल सुचाता हिने भारतातील अनेक मंदिरे पाहण्याची इच्छा व्यक्त केली. या यादीत अयोध्येचे राम मंदिरही समाविष्ट आहे.

‘भारत आणि थायलंडची संस्कृती आणि परंपरा एकसारखी’

सुचाताने भारत आणि थायलंडमधील सांस्कृतिक नात्यांविषयी भरभरून सांगितले. तिने म्हटले, “मी भारतातील अनेक मंदिरे पाहू इच्छिते. मला ही ठिकाणे खूप सुंदर आणि खास वाटतात. जसे मी म्हटले, भारत आणि थायलंडची संस्कृती आणि परंपरा एकमेकांशी खूप जुळतात. त्यामुळे या ठिकाणांना पाहणे आणि जाणून घेणे हा एक उत्कृष्ट अनुभव असेल.”

विशेष म्हणजे, भारत आणि थायलंडमधील सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध खूप जुने आहेत. थायलंडमध्ये भारताचा प्रसिद्ध ग्रंथ ‘रामायण’ याला ‘रामकियेन’ असे म्हणतात. ही कथा थायलंडच्या पुस्तकांवर, कला आणि राजे-महाराजांच्या परंपरांवर खोलवर परिणाम करते. ‘रामकियेन’ मध्ये हनुमानजींना विशेष स्थान आहे. यात त्यांच्या खेळकर स्वभावाचे चित्रण केले आहे.

चुआंगसरीने तेलंगणाच्या महिलांसाठी एक खास संदेशही दिला. मिस वर्ल्ड २०२५ चे ग्रँड फिनाले हैदराबादेत आयोजित करण्यात आले होते. तिने म्हटले, “मला तेलंगणाच्या महिलांकडून खूप प्रेरणा मिळाली आहे. तुमची ताकद, धैर्य आणि मनातील सुंदरतेने मला फार प्रभावित केले आहे. येथील महिलांकडून मला खूप प्रेम आणि सहकार्य मिळाले आहे. मला वाटते की भारताच्या महिला खूप मजबूत आहेत आणि त्यांच्या आयुष्यात जे हवे ते करू शकतात.”

जगभरातून १०८ स्पर्धकांनी भाग घेतला

मिस वर्ल्ड २०२५ मध्ये जगभरातून सुमारे १०८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. भारताकडून मॉडेल नंदिनी गुप्ता हिने या स्पर्धेत भाग घेतला. मात्र, ती फक्त टॉप २० मध्येच जागा मिळवू शकली. चेक प्रजासत्ताकची सध्याची मिस वर्ल्ड क्रिस्टिना पिस्झकोवा हिने आपला ताज नवीन मिस वर्ल्ड चुआंगसरीला सुपूर्द केला.

आपल्या या विजयाबद्दल बोलताना चुआंगसरीने म्हटले, “हे माझ्यासाठी खूप मोठे यश आहे. थायलंडला मिस वर्ल्डच्या मंचावर ओळख मिळाल्याचा मला अभिमान वाटतो. हा आमचा पहिला मिस वर्ल्डचा ताज आहे आणि त्यासाठी आम्ही ७० वर्षांहून अधिक काळ प्रतीक्षा केली आहे. मला खरंच वाटते की माझ्या देशातील लोकांनाही अभिमान वाटत आहे.”


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News