छत्रपती संभाजी महाराज हे सासऱ्यांकडून मारले गेले, औरंगजेब तर उगीच बदनाम झाला असं वादग्रस्त विधान प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केल आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथे झालेल्या राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेच्या सभेत बोलताना बच्चू कडू यांनी ही वक्तव्य केलं आहे. बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूबाबत केलेल्या या खळबळजनक विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
वतनदारीतून गुलामशाही, आदिलशाही, निजामशाही चालायची. पहिली वतनदारी बंद केली म्हणून संभाजी राजे सासऱ्यांकडून मारले गेले. नाव औरंगजेबाचं असलं तरी सासरा किती कारणीभूत आहे, हे शोधायला हवं. राजा मरण पत्करायला तयार झाला, पण त्यांनी वतनदारीला साथ दिली नाही असे बच्चू कडू यांनी म्हटले.
एखाद्या आमदाराला कापून टाका
बच्चू कडू पुढे म्हणाले, सरकार हे डुकरासारखा आहे, डुक्कर परवडलं पण सरकार नाही. शेतकऱ्यांनो, आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका… बच्चू कडू यांनी थेट आमदारांबद्दल केलेल्या वादग्रस विधानानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण आणखी पेटू शकते. विशेष म्हणजे बच्चू कडू यांच्या भाषणावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते.
तुम्ही विचाराची लढाई सोडली आणि जातीपातीची लढाई सुरू केली, त्यामुळे शेतकरी मागे राहिला. शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावं लागत असेल तर शेतकऱ्यांनी बांगड्या भराव्यात. शेतकऱ्यावर आज इतक्या मोठ्या प्रमाणात अन्याय होत असताना तुम्ही गप्प कसं राहू शकता?? तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा त्याला लाथ तरी मारता येते. अशा शब्दांत बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला.





