अवघ्या देशात गेल्या काही महिन्यांपासून बिहार विधानसभेच्या निवडणुकांची चर्चा सुरू होती. त्याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचा भाग असलेल्या हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चानं स्वतंत्रपणे 6 जागा लढवण्याची घोषणा केली आहे. महागठबंधनमधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. काही ठिकाणी एकमेकांविरोधात उमेदवार या पक्षांनी दिले आहेत. अशातच झारखंड मुक्ती मोर्चाचा हा निर्णय देखील काँग्रेस आणि राजदला धक्का मानला जात आहे.
ZMM 6 जागा स्वतंत्र लढणार, काँग्रेसला धक्का
झारखंड मुक्ती मोर्चा बिहार विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे 6 जागा लढणार आहे. पक्षाचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी ही घोषणा केली आहे. चकाई, कटोरिया, धमदाहा, पिरपैंती, मनिहारी आणि जुमई या मतदारसंघात झारखंड मुक्ती मोर्चा स्वतंत्रपणे लढेल. राजद, काँग्रेस आणि डाव्या पक्षांमधील वाद सुटलेला नाही. आतापर्यंतच्या माहितीनुसार 7 जागांवर महागठबंधनच्या पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत. लालगंज, वैशाली राजापाकर, बछवाडा, रोसरा आणि बिहारशरीफ या जागेवर महागठबंधनचे पक्ष आमने सामने आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम
मतचोरीचे गंभीर आरोप, राज्य सरकारनं जाहीर केलेल्या अनेक योजना, महिलांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्यात आलेले पैसे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बिहारमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होईल. ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान घेतलं जाईल. १४ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षातील राष्ट्रीय जनता दल यांनी दोन टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे भाजप हा सत्तेतला, तर राजद हा विरोधी बाकांवरील सर्वात मोठा पक्ष आहे. भाजप आणि राजदचे ७० पेक्षा अधिक आमदार विधानसभेत आहेत. दोन्ही बड्या पक्षांनी केलेली मागणी निवडणूक आयोगानं मान्य केली आहे.
राज्यात एकूण ७.४३ कोटी मतदार आहेत. यामधील ३.९२ पुरुष आणि ३.५० कोटी महिला मतदार आहेत. ७.२ लाख दिव्यांग मतदार आहेत. राज्यातील तरुण मतदारांचा (२० ते २९ वर्षे) १.६३ कोटींच्या घरात आहे. तर पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांची संख्या १४.०१ लाख इतकी आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासह महागठबंधन निवडणुकीच्या रिंगणात उतरेल, अशी शक्यता आहे. राजद नेते तेजस्वी यादव यांच्या नावास सर्व पक्षांची सहमती आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात महागठबंधनमध्ये जागा वाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरू आहे. महागठबंधनमधील सर्व राजकीय पक्षांमधील मतभेद दूर् करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासह आणि जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे.





