मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी नसताना देखील मनोज जरांगे पाटील आंदोलन करण्यावर ठाम आहेत. हजारो मराठा बांधवांसह जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत आणखी लाखो मराठा बांधव जोडले जाणार आहेत.
कोर्टाचा मज्जाव; मनोज जरांगे आंदोलनावर ठाम
पुढील दोन आठवड्यांसाठी पूर्वपरवानगीशिवाय कोणालाही आंदोलन करता येणार नाही, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.त्यामुळे मनोज जरांगे यांची कोंडी झाल्याची चर्चा होती. मात्र सध्यातरी मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम असल्याचे दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांना संबोधित केले.
यावेळी त्यांनी म्हटले की, “आपण सगळे जण मुंबईच्या दिशेने लगेच निघायचं, थांबायचे नाही. आपण आझाद मैदानावर कायद्याच्या कक्षेत राहून आंदोलन करायचे आहे. 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु होईल. आपल्याला उचकण्याचा प्रयत्न केला जाईल, खुनशी वागणूक दिली जाईल, पण शांत डोक्याने राहायचं. आता आरपारची शेवटची लढाई आहे, दम धरुन बाजी जिंकू शकतो.” असे मनोज जरांगे म्हणाले.
दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर मात्र मनोज जरांगेंनी जोरदार घणाघात केला आहे. ” मुंबई उच्च न्यायालयाने आपल्याला आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी थेट नाकारलेली नाही. आपण आता न्यायालयात परवानगीसाठी अर्ज करतोय. न्यायालयाने अचानक नवा कायदा काढला. आपण गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील मराठा मोर्चाची माहिती दिली होती. आपण आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले होते. मात्र देवेंद्र फडणवीसांना आयत्या वेळी याचिका दाखल केल्याने, कोर्टाने तसा निर्णय दिला ” असे मत जरांगेंनी मांडले.
जरांगेंच्या मोर्चाचे नियोजन नेमके कसे?
जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावातून सुरुवात होणाऱ्या या मोर्चात हजारो मराठा बांधव सहभागी होणार असून, 29 ऑगस्टच्या रात्री मुंबईतील आझाद मैदानावर हे आंदोलन एकवटणार आहे. जरांगे यांचा मोर्चा 27 ऑगस्ट रोजी सकाळी आंतरवली सराटी येथून सुरू होणार आहे. त्यानंतर हा मोर्चा शहागड फाटा, साष्ट पिंपळगाव, आपेगाव, पैठण कमान, घोटण, शेवगाव, मिरी नाका, पांढरी पुल, अहिल्यानगर बायपास, नेप्ती चौक, आळाफाटा असा प्रवास करणार आहे. या मार्गावरून जाताना मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या टप्प्यात जुन्नर येथे मुक्काम होईल.
28 ऑगस्ट रोजी शिवनेरी किल्ल्यावर दर्शन घेतल्यानंतर मोर्चा पुन्हा मार्गस्थ होईल. त्यानंतर राजगुरुनगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर मार्गे सरळ आझाद मैदानाकडे मोर्चा वळेल. 29 ऑगस्टच्या रात्री मुंबईत पोहोचल्यावर या आंदोलनाचा उग्र रूप पाहायला मिळेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.नेमक्या या काळात मुंबईत गणेशोत्सवाची तयारी सुरू असते. शहरात लाखोंच्या संख्येने भाविकांचे आगमन होते. या गर्दीत जरांगे यांच्या मोर्चाचा समावेश होणार असल्याने प्रशासनाची मोठी कसोटी लागणार आहे. वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, आंदोलकांची सोय, याकडे राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.





