आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपने पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसला सुरुवात केली आहे. विरोधी पक्षातील अनेक नाराज नेत्यांना पक्षात घेऊन जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती निवडणुकीत पक्ष बळकट कसा करता येईल त्यादिशेने भाजप नवनवीन डाव टाकत आहे. प्रत्येक तालुक्यांमध्ये दिग्गज नेतेमंडळींचे इनकमिंग सुरु आहे. अशातच आता पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचा एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा जोरदार रंगू लागल्या आहेत.
कोण आहे तो नेता –
आम्ही ज्या नेत्याबद्दल सांगतोय त्या नेत्याचे नाव आहे दिलीप माने.. काँग्रेसचे माजी आमदार राहिलेले आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप माने यांनी २ दिवसापूर्वी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. महत्वाची बाब म्हणजे या भेटीवेळी दिलीप माने यांच्यासोबत यशवंत माने, राजन पाटील आणि बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजीत आणि विक्रम शिंदे हे सुद्धा उपस्थित होते. हे सर्वच नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. असं झाल्यास काँग्रेस सह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटालाही हा मोठा धक्का मानला जाईल.
कधी होणार पक्षप्रवेश ?
हा पक्षप्रवेश कार्यक्रम दिवाळीनंतर भाजप कार्यालयात पार पडणार आहे असं बोललं जातंय. प्रवेशानंतर सोलापुरात कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडेल, अशी माहिती समोर आली आहे. कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन दिलीप माने काँग्रेसला जय महाराष्ट्र करणार असल्याचं सांगितलं. दिवाळीनंतर दिलीप माने काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिलीप माने यांनी काँग्रेसची साथ सोडल्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आधीच पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस मरगळलेली आहे. अनेक नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने काँग्रेसचे वर्चस्व संपत चाललंय. त्यातच आता सोलापुरातील काँग्रेसचे बडे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप मानेंनी सुद्धा पक्षाला जय महाराष्ट्र केल्यास सोलापूर काँग्रेसचे उरलेसुरले अस्तित्व सुद्धा संपल्यात जमा होईल.





