श्रीनगरमध्ये आयोजित खासगी टी-20 क्रिकेट लीग ‘इंडियन हेवन प्रीमियर लीग’ (IHPL) मध्ये गैरव्यवहाराचा प्रकार समोर आला आहे. सामने रद्द होणे आणि खेळाडूंना पेमेंट न मिळाल्याच्या बातम्यांनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
ख्रिस गेल, प्रवीणकुमार यांसारख्या अनेक नामांकित खेळाडूंचा समावेश
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, संबंधित कायद्यांच्या कलमांनुसार एफआयआर नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे. ही लीग २५ ऑक्टोबर रोजी श्रीनगरच्या बक्शी स्टेडियममध्ये सुरू झाली होती. या स्पर्धेत ख्रिस गेल आणि प्रवीण कुमार यांसारख्या अनेक नामांकित खेळाडूंचा समावेश होता.
लीगशी संबंधित खेळाडू आणि सेवा पुरवठादारांनी आरोप केला आहे की त्यांना वचन दिलेले पेमेंट मिळाले नाही आणि “तांत्रिक अडचणींमुळे” त्यांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. काही लोकांनी असा दावाही केला की त्यांना हॉटेलची खोली रिकामी करण्यास सांगण्यात आले.
आयएचपीएलमध्ये अनेक स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा समावेश होता, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) किंवा जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशन (जेकेसीए) यांनी त्याला मान्यता दिली नाही, ज्यामुळे त्याच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
ख्रिस गेलने ३ सामने खेळले
या लीगशी अनेक नामांकित खेळाडूंचा संबंध होता. वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ख्रिस गेल आणि भारताचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार ही या स्पर्धेतील मोठी नावे होती. काही काळासाठी श्रीलंकेचा थिसारा परेरा, दक्षिण आफ्रिकेचा रिचर्ड लेवी आणि पाकिस्तानी वंशाचा शोएब मुहम्मद यांचाही या लीगशी संबंध होता.
ख्रिस गेलने या लीगमध्ये तीन सामने खेळले, तर परेराने केवळ एकच सामना खेळला. मात्र, आयोजकांनी ख्रिस गेलचे पैसे दिले आहेत की नाही, की त्यांना आधीच पेमेंट करण्यात आले होते. याबाबत अद्याप स्पष्टता नाही.