हारिस रऊफवर दोन सामन्यांची बंदी
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफ याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) दोन सामन्यांसाठी निलंबित (सस्पेंड) केलं आहे.
पहिली घटना १४ सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात घडली होती. त्या वेळी रऊफवर मॅच फीच्या ३० टक्के दंडाची शिक्षा करण्यात आली आणि त्याला २ डिमेरिट पॉइंट्स देण्यात आले.
यानंतर सुपर ६ टप्प्यातील भारताविरुद्धच्या पुढील सामन्यात रऊफ पुन्हा वादात अडकला. त्याने भारतीय सलामीवीर शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांच्याशी अपमानास्पद भाषेत बोलत भांडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर, भारतीय प्रेक्षकांकडून ट्रोल करण्यात आल्यानंतर त्याने फिल्डिंगदरम्यान भडकाऊ हावभाव केले.
या वर्तनाबद्दलही रऊफला पुन्हा एकदा मॅच फीच्या ३० टक्के दंडाची शिक्षा आणि आणखी २ डिमेरिट पॉइंट्स देण्यात आले.
आयसीसीच्या नियमानुसार, २४ महीन्यांच्या कालावधीत ४ डिमेरिट पॉइंट्स मिळाल्यास खेळाडूला १ टेस्ट किंवा २ वनडे किंवा २ टी२० सामन्यांपासून बंदी घालण्यात येते. त्यामुळे हारिस रऊफला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे.
बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांना शिक्षा
भारतीय टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव, हरिस रौफप्रमाणेच, आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२१ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला. त्याला त्याच्या सामन्याच्या फीच्या ३० टक्के दंड आणि दोन डिमेरिट पॉइंट्स देण्यात आले. जर सूर्यकुमार यादव यांना आणखी दोन डिमेरिट पॉइंट्स मिळाले तर त्यांना हरिस रौफप्रमाणेच निलंबनाचा सामना करावा लागू शकतो.





