२०२५ चा विश्वचषक विजेता भारतीय महिला क्रिकेट संघ दिल्लीत दाखल झाला आहे. सर्व खेळाडू मंगळवारी संध्याकाळी पोहोचल्या. बुधवारी सकाळी टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटेल. गेल्या रविवारी टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी हरवून इतिहास रचला. ५२ वर्षांनंतर भारतीय महिला क्रिकेट संघाला एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याचे भाग्य लाभले.
अंतिम सामना नवी मुंबईत खेळवण्यात आला. जेव्हा भारतीय संघ आणि प्रशिक्षक अमोल मुझुमदार दिल्लीला रवाना होण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी विमानतळावर मोठी गर्दी जमली होती.
उद्या होणार पंतप्रधान मोदी यांची भेट
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय महिला क्रिकेट संघ बुधवारी, ५ नोव्हेंबरच्या सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत नाश्ता करणार आहे. गेल्या वर्षी २०२४ टी२० विश्वचषक जिंकलेल्या भारतीय पुरुष संघालाही पंतप्रधान मोदींनी भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी विराट कोहली, रोहित शर्मा आणि इतर भारतीय खेळाडूंशी मनमोकळ्या गप्पा मारत भरपूर हास्यविनोद केला होता.
५२ वर्षांनंतर इतिहास रचला
लॉरा वोल्पर्टच्या नेतृत्वाखाली, दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला. त्यांनी उपांत्य फेरीत चार वेळा विजेत्या इंग्लंडला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. दरम्यान, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने उपांत्य फेरीत सात वेळा विजेता आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत, भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून ५२ वर्षांत प्रथमच विश्वचषक ट्रॉफी जिंकली.