महाकुंभ मेळ्यात माळा विकणाऱ्या मोनालिसाचे दिवस आता बदलले आहेत. ती दिवसेंदिवस यशाच्या नवीन पायऱ्या चढत आहे. सोशल मीडिया सेंसेशन मोनालिसा आता मल्याळम चित्रपटात एंट्री घेण्याच्या तयारीत आहे. ती ‘नागम्मा’ नावाच्या मल्याळम चित्रपटातून साउथ इंडस्ट्रीचा भाग होणार आहे. त्यामुळे आता मोनालिसा बॉलिवूडनंतर दाक्षिणात्य चित्रपटांत झळकणार आहे. कुंभमेळ्यात माळा विकणाऱ्या मोनालिसाचे नशीब खऱ्या अर्थाने पलटले आहे.
मोनालिसा दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार
माणसाचं नशीब बदलायला एका मिनिटाचीही गरज नसते, फक्त योग्य वेळ हवा, स्टार फिरायला वेळ लागत नाही. ही म्हण महाकुंभ मेळातून प्रसिद्धीस आलेल्या मोनालिसासाठी अगदी तंतोतंत लागू होते. झोपडीत बालपण घालवणाऱ्या मोनालिसाने कधी कल्पनाही केली नसेल की एक दिवस ती चित्रपटसृष्टीचा भाग होईल. पण ते वास्तवात आलं आहे. बॉलिवूडनंतर आता मोनालिसाच्या झोळीत मल्याळम चित्रपट आला आहे. ‘नागम्मा’ नावाच्या मल्याळम चित्रपटातून साउथ इंडस्ट्रीचा भाग होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता कैलाश मुख्य भूमिकेत आहे. कैलाशला नीलाथमारा चित्रपटातील दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. Onmanorama च्या अहवालानुसार या चित्रपटाचे दिग्दर्शन बीनू वर्गीस करीत आहेत तर निर्माते आहेत जीली जॉर्ज. चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.

मोनालिसाचे नशीबच बदलले आणि आयुष्यही
मोनालिसा अभिनीत ‘नागम्मा’ या चित्रपटाची पूजा कोची येथे पार पडली. प्रख्यात दिग्दर्शक सिबी मलयिल या पूजेत सहभागी झाले आणि चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. सिबी यांना थानियावर्तनम, किरीदम, दशरथम आणि महामहिम अब्दुल्ला यांसारख्या क्लासिक चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी ओळखले जाते. दिग्दर्शक बीनू वर्गीस यांच्यासाठीही हा चित्रपट अत्यंत खास ठरणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मोनालिसासाठी ही मोठी पर्वणी असणार आहे.











