‘दशावतार’ची बॉक्स ऑफिसवर थक्क करणारी कमाई; थिएटरमध्ये सिनेमाची क्रेझ कायम!

सलग तिसऱ्या आठवड्यात देखील दशावतार सिनेमची प्रेक्षकांमध्ये चांगील क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांचा सिनेमला प्रतिसाद मिळत असल्याने कमाई बक्कळ होताना दिसत आहे.

12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला दशावतार हा सिनेमा तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करूनही थिएटरमध्ये प्रेक्षकांना आकर्षित करतोय. पहिल्या आठवड्यापासूनच या चित्रपटाने चांगली कमाई केली असून, आता तो 20 कोटींच्या टप्प्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत ‘दशावतार’ ने जोरदार घोडदौड केली आहे. थिएटरमध्ये सिनेमाची क्रेझ अद्यापही कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई

पहिल्या आठवड्यात ‘दशावतार’ने तब्बल 9.20 कोटींचा गल्ला जमा केला. दुसऱ्या आठवड्यात थोडी घसरण झाली असली तरीही 9.25 कोटींची कमाई झाली. तिसऱ्या आठवड्यात शुक्रवारची कमाई अवघी 45 लाख इतकी होती, जी चित्रपटाच्या आतापर्यंतच्या प्रवासातील सर्वात कमी रक्कम होती. मात्र शनिवारी चित्रपटाने पुन्हा उभारी घेतली आणि जवळपास 90 लाखांची कमाई केली. त्यामुळे 27 सप्टेंबरपर्यंत एकूण गल्ला 19.80 कोटींवर पोहोचला आहे. रविवारीची (28 सप्टेंबर) आकडेवारी आल्यानंतर 20 कोटींचा टप्पा सहज पार होईल, असा अंदाज वर्तवला जातोय. त्यामुळे एखाद्या मराठी सिनेमाच्या दृष्टीने हे मोठे यश म्हणावे लागेल.

‘दशावतार’ची भव्यता, कथानक आणि कलाकारांची ताकदवान भूमिका यामुळे प्रेक्षकांना हा सिनेमा आकर्षित करतोय. त्यामुळे तिसऱ्या आठवड्यानंतरही या चित्रपटाची कमाई सुरू राहण्याची शक्यता आहे.

दशावतार चित्रपटाचे कथानक नेमके काय?

कोकणातील पारंपरिक लोककला आणि त्याचं मर्म समजून घेत त्या माध्यमातून कोकणातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी केला आहे. बाप-लेकाच्या प्रेमापासून सुरू झालेली ही कथा कोकणात विकासाच्या नावाखाली निसर्गाचा नाश करू पाहणाऱ्यांच्या विरोधात संघर्ष उभा करणाऱ्या गावकऱ्यांपर्यंत येऊन पोहोचते. ही अनोखी कलाकृती मराठीसह इतर भाषिक प्रेक्षकांनाही भावली आहे.

चित्रपटाची मांडणी करताना कोकणातील जंगलं, कातळशिल्प, नदी, मंदिरं आणि तिथं रंगणारा दशावतार या सगळ्यांचा दिग्दर्शकाने सुंदर वापर करून घेतला आहे. या चित्रपटातील दृश्ये कुठेही कृत्रिम वाटणार नाही, इतक्या सुंदर पद्धतीने सिनेमॅटोग्राफ देवेंद्र गोलतकर यांनी सर्वकाही टिपलं आहे. कोकणातील घनदाट जंगलात अनुभवायला मिळणारी गूढता, शांतता जशाच्या तशा पोहोचवण्यासाठी तांत्रिक बाबींवर प्रचंड मेहनत घेतलेली दिसून येते. आगामी काही दिवसांत चित्रपटाला प्रेक्षकांची मिळणारी पसंती वाढताना दिसेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News