अभिनेत्री राणी मुखर्जीने (Rani Mukherjee) ३ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईतील महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालयात आयोजित ‘सायबर अवेअरनेस मंथ २०२५’ या कार्यक्रमात सहभाग घेतला. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता वाढवणे हा होता. राणी मुखर्जी ‘मर्दानी’सारख्या हिट महिला-प्रधान चित्रपटांतून पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका साकारत आली असून, ती नेहमीच पोलीस दलाच्या कार्याचे समर्थन करत आलेली आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अभिनेता अक्षय कुमार यांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला.
काय म्हणाली राणी मुखर्जी Rani Mukherjee
राणी मुखर्जीने आपल्या भाषणात महिलांवर आणि लहान मुलांवर होणाऱ्या सायबर गुन्ह्यांविषयी चिंता व्यक्त केली आणि सांगितले की या गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे. ती म्हणाली की, सायबर गुन्हे आपल्या घरात चोरपावलांनी शिरले आहेत आणि त्यामुळे मानसिक, आर्थिक आणि सामाजिक नुकसान होऊ शकतं. एक महिला आणि आई म्हणून, त्या म्हणाल्या की प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित राहण्यासाठी काय करावं आणि मदत कुठे मिळेल याची माहिती असली पाहिजे.

पोलिसांचे विशेष कौतुक –
राणी (Rani Mukherjee) यांनी महाराष्ट्र पोलीस दलाच्या सायबर सेलचं विशेष कौतुक केलं. त्या म्हणाल्या की हे खरे नायक आहेत, जे पडद्यामागे राहून आपली डिजिटल जागा सुरक्षित ठेवण्यासाठी सातत्याने काम करत आहेत. त्यांनी हेल्पलाइन क्रमांक १९३० आणि १९४५ या क्रमांकांचाही उल्लेख करत नागरिकांना या सेवेचा उपयोग करण्याचं आवाहन केलं. कार्यक्रमाच्या शेवटी राणी मुखर्जीने नागरिकांना आवाहन केलं की आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन सुरक्षित डिजिटल समाजासाठी काम केलं पाहिजे. त्यांनी सांगितलं की त्या सध्या ‘मर्दानी ३’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत आणि हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
राणी मुखर्जी यांचा सायबर सुरक्षेसाठी दिलेला संदेश आणि त्यांचा प्रत्यक्ष सहभाग समाजाला जागरूक करण्याच्या दृष्टीने अत्यंत प्रेरणादायी आहे. सरकार, पोलीस आणि नागरिक यांनी एकत्र येऊन सायबर गुन्ह्यांविरोधात भक्कम उभं राहणं हीच काळाची गरज आहे.











